Join us

Mumbai Fire in Slum area: मुंबईत झोपडपट्टीला आग, ५० झोपड्या जळून खाक, एका चिमुरड्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 3:12 PM

१५ सिलेंडर्सचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती

Mumbai Fire in Slum area: मुंबईतील मालाड भागात झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगितली जात आहे. त्यासोबत, सुमारे ५० हून अधिक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचेही चित्र आहे. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने सध्या तरी आग आटोक्यात आली असली तर झोपडपट्टीधारकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईतील मालाड परिसरामधील दिंडोशी येथील जामऋषी नगर (आंबेडकर नगर) मध्ये सकाळी हा प्रकार घडला. सुरूवातीला छोट्या वाटणाऱ्या आगीने नंतर बघता बघता रौद्ररुप धारण केले. त्यामुळे आजूबाजुच्या झोपड्यांनीही पेट घेतला आणि आगीचा भडका उडाला. पश्चिम उपनगरांतील मालाड पुर्वकडील जामऋषी नगर (आंबेडकर नगर) या वन जमिनीवरील असलेल्या झोपडपट्टीला सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास ही आग लागली.

झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एक १२-१४ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात असून ही आग १५ सिलेंडरचा स्फोट झाल्याने लागल्याचे सांगितले जात आहे. वन जमिनीवर प्लास्टिक आणि लोखंडी पत्र्यांच्या झोपड्या आहेत. या आगीत १०-१५ जणही जखमी झाले आहेत. तर ५० पेक्षा अधिक झोपड्यांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आल्याने आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.

दामूनगर नंतरची सर्वात मोठी आग

कांदिवली येथील वन जमिनवरील वसलेल्या दामूनगर येथील झोपडपट्टीला ४ डिसेंबर २०१५ साली असाच प्रकारे सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या आगीत ७ झोपडीधारकांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर २५ जण जखमी झाले होते. या आगीच्या ७ वर्षांनंतर पुन्हा अशाच प्रकारची आग जामऋषी नगरातील झोपडपट्टीला लागलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील वन जमिनीवरील झोपड्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

टॅग्स :मुंबईआगमालाड पश्चिम