मुंबई : उच्चभ्रू वसाहतीत स्वस्त घराच्या जाहिरातीने सांताक्रुझमधील ७० वर्षांच्या वृद्धाने सर्व जमा पुंजी घरासाठी खर्च केली. मात्र घराचा ताबा देण्याची वेळ आली तेव्हा ते घर आधीच विकले असल्याची माहिती त्यांना मिळाली. अंधेरीत घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ ओढावली आहे. वृद्ध मॅथ्यू ओलीवरा शेख यांच्या तक्रारीवरून मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हाच फ्लॅट शेख यांच्यासह आणखी पाच ते सहा जणांना विकण्यात आला आहे. यातून त्रिकूटाने ७ कोटींहून अधिक रकमेवर डल्ला मारल्याचा संशय आहे.सांताक्रुझ परिसरात राहणाºया शेख यांचे स्पेअर पार्ट्सचे वर्कशॉप आहे. शेख हे घराच्या शोधात होते. ‘९९ एकर’ या संकेतस्थळावरून त्यांनी घराचा शोध सुरू केला. तेव्हा अंधेरी पूर्वेतील जिजामाता मार्गावर असलेल्या गुरू निवास या उच्चभ्रू इमारतीत ७५ लाखांत घर मिळत असल्याचे त्यांना समजले. त्यासंदर्भात त्यांनी राकेश शेट्टी, मंदार शेट्टी, सुनील भानुशाली या त्रिकूटाशी संपर्क साधला. तिघेही दहिसर येथील रहिवासी आहेत. त्रिकूटानेही फ्लॅट, खोटी कागदपत्रे दाखवून शेख यांना विश्वासात घेतले. शेख यांना फ्लॅट आवडला. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात उच्चभ्रू वस्तीत स्वस्तात घर मिळत असल्याने आयुष्यभराच्या जमा पुंजीसह वर्कशॉप भाड्यावर ठेवून त्यांनी पैसे जमा केले. फ्लॅटसाठी वर्षभरात ७५ लाख रुपये त्रिकूटाच्या खात्यात जमा केले.नोव्हेंबर २०१७मध्ये घराचा ताबा देण्याचे ठरले असतानाही त्रिकूटाने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अशात हे घर आधीपासून आणखी तीन ते चार जणांना विकले असल्याची माहिती शेख यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राकेश शेट्टी, मंदार शेट्टी, सुनील भानुशाली या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत : याच फ्लॅटसाठी शेख यांच्यासह रविकला शेट्टी यांची ७९ लाखांची तर सुजाता रमेश पाटील यांची ३० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे याच फ्लॅटसाठी आणखी तिघांना चुना लावल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातही या त्रिकूटावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दोन महिन्यांपूर्वी राकेश आणि मंदारला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.
मुंबई : एकच फ्लॅट वृद्धासह पाच जणांना विकला , दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 1:46 AM