मुंबई : मुसळधार पावसाने आज मुंबईला चांगलेच झोडपून काढले. सखल भागात पाणी साचल्याने मुंबईतील अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती तर काही ठिकाणी वाहतूककोंडी पाहायला मिळाली. जोरदार पावसाचा फटका लोकलाही बसला. काही मार्गावर पाणी साचल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. सकल भागात अर्धा ते तीन फुटापर्य़ंत पावसाचे पाणी साचले होते.
मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण येथे पाणी साचल्याने लोकल सेवा ४५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मरीन ड्राइव्ह दरम्यान पाणी साचल्याने लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे मुंबईकरांना कार्यालयात पोहोचण्यासाठी लेटमार्क लागला.
भारतीय हवामान खात्याने मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला होता. गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाने मुंबई आणि मुंबई उपनगराला झोडपले. मुंबई उपनगरातील शहर, पूर्व पश्चिम उपनगर येथे अनेक ठिकाणी साधारणपणे अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. तर कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचा रेल्वे स्थानकांवर खोळंबा झाला होता.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील आझाद मैदान, काळबादेवी, माटुंगा, भायखळा, डी. एन. नगर, ओशिवरा, कांदिवली, दहिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. पोईसर, समता नगर येथे तीन फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला.