मुंबई : रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले आहे. शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले असून मुंबईकरांचे जनजीवन ठप्प झाले आहे. तर, मालाड पूर्वेकडील भागात पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक कोलमडली आहे.
मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गावर डोंगराचा काही भाग कोसळला. एका कार समोरच हा भाग कोसळला असून विजेचा खांबही कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मीरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र, मुंबईहून मीरारोडला जाणारा मार्ग सुरू आहे.
दरम्यान, मुंबईसह उपनगरात दोन दिवस (४, ५ ऑगस्ट) अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारे आणि किनाऱ्याजवळ नागरिकांनी जाणे टाळावे. तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, अशा सूचना मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.
मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे. हिंदमाता येते तर वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडली आहेत. हिंदमातामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंपाद्वारे पाणी काढण्यास सुरुवात केली आहे.
याचबरोबर, ठाणे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. ठाण्यात घोडबंदर येथे पाणी साचल्याने या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.