मुंबई- छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, 30हून अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर या दुर्घटनेचे मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींना भेट दिली आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसदेखील केली. दुर्घटनेत 10 लोक जखमी असून, एक आयसीयूमध्ये आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. संध्याकाळपर्यंत जबाबदारी कोणाची हे निश्चित करा, असे तातडीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आधीच दिले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही अशा घटना घडणं हे धक्कादायक आहे. ज्या पुलांचं ऑडिट झालंय, त्यांचं पुन्हा ऑडिट व्हावं, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून दादाभाई नौरोजी मार्गापलीकडे जाण्यासाठी वापरात असलेल्या पादचारी पुलाचा भाग गुरुवारी संध्याकाळी भरगर्दीच्या वेळी भरधाव वाहनांनी भरलेल्या रस्त्यावर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत तीन महिलांसह 6 जण ठार आणि 33 जण जखमी झालेत. अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40), जाहिद खान (32), भक्ती शिंदे (40), तपेंद्र सिंग (35), मोहन कायगडे (50) अशी मृतांची नावे आहेत. त्यातील प्रभू, तांबे या जीटी रुग्णालयातील परिचारिका आहेत. त्या काम संपवून घरी परतत होत्या. 11 जखमींना जी. टी. आणि 17 जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गर्दीच्या वेळी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे डॉ. दादाभाई नौरोजी मार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.