Join us

मुंबई फुटबॉल संघटनेस मिळाले हक्काचे मैदान

By admin | Published: October 30, 2015 12:36 AM

गेल्या अनेक काळापासून हक्काच्या मैदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेची (एमडीएफए) अखेर प्रतीक्षा संपली

मुंबई : गेल्या अनेक काळापासून हक्काच्या मैदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेची (एमडीएफए) अखेर प्रतीक्षा संपली. म्हाडाने नुकताच वांद्रे येथील भूखंड एमडीएफएच्या स्थानिक क्लबला उपलब्ध करून दिला आहे.मैदानांच्या कमतरतेमुळे एमडीएफएला आपल्या विविध स्पर्धांचे साखळी सामने पार पाडताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. यामुळे एमडीएफएला आपल्या लीग स्पर्धा पूर्ण करण्यासाठी अनेक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागायची. तसेच या स्पर्धांच्या सामन्यांसाठी एमडीएफएला मुंबईतील सेंट झेविअर्स (परळ), कुपरेज मैदान (चर्चगेट) किंवा इतर क्रीडा संघटनांच्या मैदानांवर अवलंबून राहावे लागत असे. यामुळे खेळाडूंचीदेखील विनाकारण दमछाक होत असे. मात्र आता म्हाडाकडून हक्काची जागा मिळाली असल्याने या सर्व समस्यांतून सुटका होणार असल्याची प्रतिक्रिया एमडीएफएकडून व्यक्त होत आहे. एमडीएफएच्या स्थानिक फुटबॉल संघटनेने या मैदानाचा ताबा घेतला असून सध्या मैदानाच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. एमडीएफएचे चेअरमन आदित्य ठाकरे यांनी आता मुख्य सामन्यांसाठी अंधेरी क्रीडा संकुलातील मैदानासाठी पुढाकार घेतल्याची माहितीही मिळाली आहे. येथे सध्या नूतनीकरणाचे काम सुरू असून या ठिकाणी पुढील वर्षी मार्चमध्ये एमडीएफएचा आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचा विचार आहे.