कारवर भारत सरकारचा स्टिकर लावून घातला कोट्यवधींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 09:06 AM2018-06-19T09:06:43+5:302018-06-19T09:06:43+5:30
भारत सरकारमध्ये सचिव पदावर कार्यरत असल्याचे सांगून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ठकसेनास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई - भारत सरकारमध्ये सचिव पदावर कार्यरत असल्याचे सांगून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ठकसेनास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिलिंद नवाटे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून खोटी कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहे. मिलिंद हा भारत सरकारच्या नावाचे स्टिकर लावलेल्या महागड्या गाड्यांमधून प्रवास करत असे.
मिलिंद नवाटे नावाचा ठकसेन अनेक लोकांना गंडा घालत असल्याची खबर वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर अजय सावंत आणि सचिन कदम यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. आपण दहा कोटींपासून 100 कोटींपर्यंत कर्ज देऊ शकतो, असा दावा तो करत असे. मात्र ही रक्कम मिळवण्यासाठी प्रथम एक टक्का कमिशन द्यावे लागेल, असे सांगून तो कमिशनची मागणी करत असे.
आपण भारत सरकारमध्ये सचिव आहोत यावर लोकांचा विश्वास बसावा यासाठी नवाटे हा लोकांना भेटण्यासाठी मुंबईतील फाइव्ह किंवा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये बोलवत असे. चौकशीमध्ये नवाटे हा रियल इस्टेट एजंट असून त्याच्याविरोधात मुंबई, ठाणे, दिल्ली आणि हरयाणामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.