Join us

Ganesh Chaturthi 2021, Special Trains: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७२ विशेष रेल्वेगाड्या; जाणून घ्या सविस्तर माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 3:25 PM

Ganesh Chaturthi 2021, Special Trains: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर, रेल्वेकडून ७२ विशेष रेल्वेगाड्या

Ganesh Chaturthi 2021, Special Trains: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्वासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढू नये यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष नियोजन करण्यात येत आहे. यावेळी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यात एकूण ७२ विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पनवेल आणि सावंतवाडी रोड/ रत्नागिरी या मार्गांवर धावणार आहेत. 

गणेशोत्सव काळात कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वेमार्गावर प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणावत वाढते. त्यात कोरोनाच्या संकटाचा सामना करताना गर्दी नियंत्रित राहावी या उद्देशानं मध्य रेल्वे प्रशासनानं आतापासूनच काही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यात जास्तीत जास्त विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार एक एसी-२ टायर, एसी-३ टायर, चार एसी-३ टायर, ११ स्लीपर क्लास, ६ सेकंड क्लास सिटिंग असे डबे असलेल्या रेल्वेगाड्या नियोजित करण्यात येणार आहेत. 

सीएसएमटी-सावंतवाडी डेली स्पेशल रेल्वेच्या ३६ फेऱ्यागणेशोत्सव काळात ५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाहून दैनंदिन पातळीवर रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सीएसएमटी-सावंतवाडी डेली स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. ही गाडी सावंतवाडी रेल्वेस्थानकावर त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. त्यानंतर याच कालावधीसाठी म्हणजेच ५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर पर्यंत सीएसएमटी-सावंतवाडी डेली स्पेशल रेल्वे सावंतवाडी रेल्वे स्थानकातून २ वाजून ४० मिनिटांनी सुटेल तर सीएसएमटी रेल्वे स्थानकात दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. डेली स्पेशल रेल्वेगाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, मानगाव, वीर, खेड, चिपळूण, ,सावर्डे, अरावली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, अदावली, विलावडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, नंदगाव, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे. 

सीएसएमटी-रत्नागिरी द्वै-साप्ताहिक विशेष ट्रेनच्या १० फेऱ्यारेल्वे क्रमांक ०१२२९ द्वै-सप्ताहिक विशेष रेल्वे ६ सप्टेंबर २०२१ ते २० सप्टेंबर २०२१ या कालावधीत दर सोमवारी आणि शुक्रवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दुपारी १ वाजून १० वाजता सुटेल. तर त्याच दिवशी रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी रत्नागिरीत पोहोचेल. त्याचपद्धतीनं रेल्वे क्रमांक ०१२३० द्वै-साप्ताहिक स्पेशल रेल्वे ९ सप्टेंबर २०२१ ते २३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत दर रविवार आणि गुरुवारी रत्नागिरीहून रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. या रेल्वेगाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, मानगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरावली रोड आणि संगमेश्वर या स्थानकांवर थांबेल. 

पनवेल-सावंतवाडी त्रै-साप्ताहिक विशेष रेल्वेच्या १६ फेऱ्यारेल्वे क्रमांक ०१२३१ त्रै-साप्ताहिक विशेष रेल्वे ७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत एकूण १६ फेऱ्या होणार आहेत. दर आठवड्याच्या मंगळवार, बुधवार आणि शनिवारी पनवेलहून सकाळी ८ वाजता सुटणार आहे. तर त्याच दिवशी रात्री ८ वाजता सावंतवाडी स्थानकावर पोहोचणार आहे. त्यापद्धतीनं रेल्वे क्रमांक ०१२३२ त्रै-साप्ताहिक विशेष रेल्वे ७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी सावंतवाडीहून रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी ही रेल्वे पनवेल स्थानकावर पोहोचेल. या विशेष रेल्वेच्या एकूण १६ फेऱ्या होणार आहेत. रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरावली रोड, संगमनेर, रत्नागिरी, अदावली, विलावडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, नंदगाव, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबेल. 

पनवेल-रत्नागिरी द्वै-साप्ताहिक विशेष रेल्वेच्या १० फेऱ्यारेल्वे क्रमांक ०१२३३ द्वै-साप्ताहिक विशेष रेल्वे ९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत दर गुरुवार आणि रविवारी पनवेलहून सकाळी ८ वाजता सुटणार आहे. तर त्याच दिवशी दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोहोचेल. तर रेल्वे क्रमांक १२३४ द्वै-साप्ताहिक रेल्वेगाडी दर सोमवार आणि शुक्रवारी रत्नागिरीहून रात्री साडेअकरा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. ही गाडी रोहा, मानगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरावली रोड आणि संगमेश्वर या स्थानकांवर थांबेल. 

महत्वाची बाब म्हणजे या विशेष रेल्वेगाड्यांसाठीचं तिकीट बुकिंग ७ जुलै २०२१ पासून सुरू होणार आहे. रेल्वेच्या सर्व पीआरएस केंद्र आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच www.irctc.co.in येथे भेट देऊन तिकीट आरक्षित करता येणार आहे. केवळ कन्फर्म तिकीट मिळणाऱ्यांनाच या रेल्वेगाड्यांतून प्रवास करता येणार आहे. याशिवाय कोरोना संबंधिच्या सर्व नियमांचं पालन करणं प्रवाशांना बंधनकारक असणार आहे. 

टॅग्स :गणेशोत्सवमध्य रेल्वेरेल्वे