Ganesh festival in Mumbai: मुंबईत तब्बल ३७,२०८ गणेश मूर्तींचं विसर्जन; पुढच्या वर्षी लवकर या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 04:08 PM2024-09-18T16:08:07+5:302024-09-18T16:09:13+5:30
Ganesh festival in Mumbai: मनपाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ३७,२०८ गणेश मूर्तींचं विसर्जन झालं आहे.
Ganesh festival in Mumbai: मुंबईतीलगणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. अनंत चतुदर्शी दिवशी सुरु झालेला विसर्जन मिरवणुकीचा सोहळा अगदी आज सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सुरू होता. मनपाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ३७,२०८ गणेश मूर्तींचं विसर्जन झालं आहे.
गिरगावच्या चौपाटीवर सकाळी साडेदहा वाजेपर्यंत विसर्जन सुरू होतं. सुप्रसिद्ध लालबागच्या राजाची मिरवणूक सकाळी साडेआठच्या सुमारात चौपाटीवर दाखल झाली होती. दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर मुंबईकरांनी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला. चौपाट्यांसोबतच मुंबईत गिरगाव, दादर, जुहू, मार्वे आणि अक्सा इथे कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
"बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ३७,०६४ गणेश मूर्तींचं विसर्जन झालं. यात ५७५२ सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचा समावेश आहे. तर ३१,१०५ घरगुती गणपतींचा समावेश आहे", असं एका मनपा अधिकाऱ्यानं सांगितलं.
दरम्यान, यंदाच्या विसर्जनामध्ये एकूण ११,४१९ गणपती मूर्तीचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन झालं आहे. हा आकडा एकूण मूर्तीच्या ३० टक्के इतका आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ३७ टक्के इतकं नोंदवलं गेलं होतं.
"विसर्जन सामान्यत: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत चालू असते. २०२० ते २०२२ दरम्यान तीन वर्षांसाठी कोविडमुळा सार्वजनिक मंडळांची संख्या तात्पुरती कमी झाली होती. त्यामुळे त्या काळात झालेल्या सार्वजनिक विसर्जनांची संख्या तुलनेने कमी होती", अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे (बीएसजीएसएस) अध्यक्ष नरेश दहिभावकर यांनी दिली.