लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आषाढी एकादशीनिमित्त मुंबईकरांसाठी पंचम निषाद या संस्थेने आयोजित केलेल्या ‘बोलावा विठ्ठल’ या कार्यक्रमात गायिका देवकी पंडित यांनी मुंंबईकरांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी सादर केलेल्या अभंगांसाठी उपस्थितांनी ‘वन्स मोअर’ची मागणी केली. मंगळवारी पंचम निषाद या संस्थेने किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेने हा अभंगवाणीचा कार्यक्रम गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना समर्पित केला. ‘लोकमत’ने या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. कार्यक्रमात पंडित यांच्या सोबत ज्येष्ठ गायक आनंद भाटे, तरुणांचा लाडका गायक राहुल देशपांडे आणि गायक जयतीर्थ मेवुंडी यांनी विविध अभंग सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गेल्या बारा वर्षांपासून ‘पंचम’चा ‘बोलावा विठ्ठल’ हा कार्यक्रम राज्यात गाजत आहे. हा कार्यक्रम गेल्या १२ वर्षांपासून लोकमत राज्यभर पोहोचवत आहे. आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि जयतीर्थ मेवुंडी यांनी एकत्र अभंग सादर करून रसिकांचे स्वागत केले. त्यानंतर किशोरीताई आमोणकरांच्या पट्टशिष्या देवकी पंडित यांनी त्यांच्या सुरेल गाण्याने उपस्थितांची मने जिंकली. सर्व कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात ज्ञानेश्वरांचे अमृतानुभव देखील सादर केले. साई बँकर, प्रकाश शेजवळ, आदित्य ओके, सूर्यकांत सुर्वे, प्रशांत पांडव आणि एस. आकाश यांनी गायकांना संगीताची साथ दिली. १७ वर्षीय एस. आकाशने त्याच्या बासरीच्या सुरांनी सर्वांना गुंग केले.
अभंगांच्या सुरात मुंबईकर दंग
By admin | Published: July 05, 2017 7:02 AM