दहिसर पोलिसांची कारवाई : अठरा लाख किमतीची ४७ वाहने हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई तसेच ठाणे परिसरात वाहनांची चोरी करणाऱ्या टोळीला बुधवारी दहिसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १८ लाख ५ हजार रुपये किमतीच्या ४७ चोरीच्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मालवणी परिसरातील काही इसम मोटारसायकल आणि वाहनांची चोरी करीत असल्याची माहिती दहिसर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे आणि पथक लक्ष ठेवून असताना एका संशयित रिक्षाचालकाला त्यांनी २ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पायल हॉटेल ब्रिजकडून ताब्यात घेतले. त्याच्यासाेबत रिक्षात अन्य एक जण हाेता.
चौकशीत रिक्षाची कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे सापडली नाहीत. दरम्यान, ती रिक्षा ७ जानेवारी, २०२१ रोजी चोरी झाल्याची नोंद दहिसर पोलिसांत असल्याचे समजले. रिक्षातील दोघेही अल्पवयीन हाेते. त्यांच्या चौकशीत वाहन चोरी करणाऱ्या टोळीत सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबईत, ठाण्यातून चाेरी केलेल्या ७ रिक्षा, १४ मोटारसायकली आणि २० स्पोर्ट्स सायकलींबाबत माहिती दिली. यातील सहा चोरीच्या वाहनांची त्यांनी विक्री केली होती, त्या विकत घेणाऱ्या अस्लम शेख, उमेश राठोड, इर्शाद चौधरी व सोहेल शाह अशा चौघांना डॉ. घार्गे यांच्या पथकाने अटक केली. या टोळीवर मीरा रोड, काशिमीरा, चारकोप, गोरेगाव, दिंडोशी, दहिसर एमएचबी, दहिसर, नयानगर तसेच कस्तुरबा पोलिसांत गुन्हे दाखल आहेत.
....................................