मुंबई गारेगार : बोरीवली १३ आणि पवई १४ अंश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 05:09 AM2020-01-16T05:09:37+5:302020-01-16T05:09:49+5:30
गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंद झाले
मुंबई : राज्यात बुधवारी सर्वात कमी किमान तापमान नांदेड आणि गोंदिया येथे ११.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मुंबईचे किमान तापमान १६.९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. विशेषत: बोरीवली १३ आणि पवईचे किमान तापमान १४ अंश नोंदविण्यात आले असून, अनेक दिवसांनी किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा गारठा अनुभवास येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंद झाले. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. १६ ते १९ जानेवारी या कालावधीत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १६ जानेवारी रोजी मुंबईचे आकाश निरभ्र, तर १७ जानेवारी रोजी मुंबईचे आकाश अंशत: ढगाळ राहील.