Omicron Mumbai: मुंबईने दिलासा दिला! २२१ चाचण्यांमध्ये ओमायक्रॉनचा नवीन रुग्ण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 06:55 PM2021-12-09T18:55:05+5:302021-12-09T18:55:45+5:30
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण २७७ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोविडचा नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडल्याने मुंबईत खळबळ उडाली. मात्र कस्तुरबा रुग्णालयात कोविड बाधित २२१ रुग्णांच्या जिनोम सिक्वेसिंग चाचणीत सौम्य प्रकारच्या ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे २४ तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे १९५ टक्के रुग्ण आढळले आहेत. तसेच, ओमायक्रॉनचा नवीन रुग्ण अद्याप सापडलेला नाही. विशेष म्हणजे २२१ पैकी एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण २७७ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यातील २२१ रुग्ण हे मुंबईतील नागरिक असून या नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष गुरुवारी जाहीर करण्यात आला.
यापैकी २४ रुग्ण (११ टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर १९५ रुग्ण (८९ टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित दोघे जण ओमायक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूने बाधित असल्याचे यापूर्वीच राज्य सरकारने जाहीर केले आहे. या दोघांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या निकटवर्तीयांपैकी एकालाही कोविडची लागण झाली नसल्याचे आढळून आले आहे.