काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला येथे गजबजलेल्या रस्त्यावर बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने वाहनांना धडक देत अनेक पादऱ्यांना चिरडल्याने मोठी दुर्घटना घडली होती. तसेच त्यात काही जणांचा मृत्यूही झाला होता. दरम्यान, आता तशीच घटना घाटकोपर येथे घडली आहे. घाटकोपरमधील चिरागनगर भागात आज संध्याकाळी एका भरधाव टेम्पोने चार ते पाच जणांना चिरडले असून, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चिरागनगर भागात एक भरधाव टेम्पो मच्छी आणि भाजी मार्केट असलेल्या भागात शिरला. या टेम्पोखाली चार ते पाच जण चिरडले गेले. तसेच या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, या टेम्पोचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता, असा दावाही काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.