"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:55 PM2024-05-14T12:55:27+5:302024-05-14T12:56:40+5:30

घाटकोपर परिसरात धुळीचे वादळ आणि पावसादरम्यान पेट्रोल पंपावर लावण्यात आलेलं 100 फूट लांब आणि 250 टन वजनाचे होर्डिंग खाली पडलं. होर्डिंग पडल्याने 14 जणांचा मृत्यू झाला. तर 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

mumbai ghatkopar hoarding collapse many died due to rain and wind | "लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू

"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू

मुंबईत सोमवारी पाऊस आणि वादळामुळे मोठा हाहाकार पाहायला मिळाला. घाटकोपर परिसरात धुळीचे वादळ आणि पावसादरम्यान पेट्रोल पंपावर लावण्यात आलेलं 100 फूट लांब आणि 250 टन वजनाचे होर्डिंग खाली पडलं. होर्डिंग पडल्याने 14 जणांचा मृत्यू झाला. तर 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच 78 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, पावसामुळे घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर अनेक लोक थांबले होते. तर काही लोक आपल्या वाहनात इंधन भरण्यासाठी आले होते. त्याच दरम्यान हे होर्डिंग पडले. बालाजी शिंदे हेही होर्डिंगच्या खाली दबले देले होते. दोन तासांनंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. बालाजी शिंदे हे वाहनात इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले होते. त्यांनी सांगितलं की, एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला नवी मुंबईला जायचे होते, ते इंधन भरण्यासाठी सीएनजी पंपावर पोहोचले तेव्हा होर्डिंग पडलं.

पावसापासून वाचण्यासाठी स्वप्नील नावाचा तरुणही सीएनजी पंपावर पोहोचला होता. त्यानंतर होर्डिंग पडले आणि तो त्याखाली अडकल्याचं त्याने सांगितलं. मात्र, तो कसा तरी स्वत:ला बाहेर काढण्यात यशस्वी झाला. त्याने सांगितलं की लोक मदतीसाठी ओरडत होते, पण आम्ही काहीही करू शकलो नाही. स्वप्नीलच्या डोळ्याला आणि शरीराच्या इतर भागाला दुखापत झाली आहे

शुभम आणि वरुण हे दोघेही स्कूटरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचले होते. वरुणने सांगितलं की. पेट्रोल पंपावर असताना मला फोन आला आणि मी पेट्रोल पंपाच्या बाहेर आलो. मी बोलत असताना अचानक होर्डिंग पडलं आणि शुभम त्यात अडकल्याचं मला दिसलं. शुभमलाही दुखापत झाली आहे. शुभमवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
टिळक नगर टॅक्सी चालक गोपाळ दत्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते त्यांच्या टॅक्सीमध्ये इंधन भरण्यासाठी थांबले होते आणि होर्डिंग पडलं. गोपाळ तीन तास होर्डिंगखाली अडकले होते, त्यानंतर एनडीआरएफने त्यांना बाहेर काढलं. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, होर्डिंग अचानक झाड उन्मळून पडल्यासारखं खाली पडलं. होर्डिंग पडताना दिसताच मी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळू लागलो. पण माझा भाऊ त्याखाली अडकला. मात्र तो बचावला आणि किरकोळ जखमी झाला.
 

Web Title: mumbai ghatkopar hoarding collapse many died due to rain and wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.