Join us

अवाजवी हॉर्नला कंटाळून 11 वर्षाच्या मुलीने लिहिलं उद्योगपती आनंद महिंद्रांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 12:15 PM

मुंबईत राहणाऱ्या महिका मिश्रा या 11 वर्षाच्या मुलीने आनंद महिंद्रा यांना पत्र लिहून काही लोक गाडी चालवताना अवाजवी हॉर्न वाजवून लोकांना त्रास देत असतात असं नमूद केलं आहे. इतकंच नाही तर महिकाने स्वतः होऊनच या प्रश्नावर उपायही सुचवले आहेत.

मुंबई -  महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे सोशल मिडीयावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरुन एक फोटो शेअर केलाय. यामध्ये आनंद्र महिंद्रा यांनी 11 वर्षाच्या एका मुलीने त्यांना लिहलेलं पत्र शेअर केलं आहे. मुंबईत राहणाऱ्या महिका मिश्रा या 11 वर्षाच्या मुलीने आनंद महिंद्रा यांना पत्र लिहून काही लोक गाडी चालवताना अवाजवी हॉर्न वाजवून लोकांना त्रास देत असतात असं नमूद केलं आहे. हे पत्र वाचून आनंद महिंद्रा यांनी तिचं कौतुक करत दिवसभरातील व्यस्त कामातून आल्यानंतर अशी काही पत्रे असतात ती वाचून तुमचा दिवसभराचा थकवा दूर होतो असं सांगितलं. 

नेमकं या पत्रात महिका मिश्रा या मुलीने अवाजवी हॉर्न वाजवल्यामुळे लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तसेच ध्वनीप्रदुषण रोखण्यास मदत होईल असे उपाय सुचवले आहेत. या पत्रामध्ये महिकाने म्हटलंय की, मला गाडीमध्ये बसून फिरायला जाणे फार आवडते, मात्र रस्त्यावरून जाताना इतर वाहने अवाजवी आणि कर्णकर्कश हॉर्न वाजवतात ते मला अजिबात आवडत नाही. विनाकारण सातत्याने हॉर्न वाजविण्याची सवय इतर वाहचालकांसाठी अतिशय त्रासदायक ठरते. कारण कितीही हॉर्न वाजवला तरी वाहतूक कोंडीतून तुमचं वाहन पुढे जाणार नाही. तसेच हॉर्न वाजवल्यामुळे ध्वनी प्रदुषण देखील वाढत असते. हेच कमी करण्यासाठी यावर कायमस्वरुपी उपाय करणे गरजेचे आहे असं तिने या पत्रात लिहलं आहे. इतकंच नाही तर महिकाने स्वतः होऊनच या प्रश्नावर उपायही सुचवले आहेत.

प्रत्येक गाडीमध्ये अशाप्रकारे हॉर्न बसविला पाहिजे जणेकरुन तो हॉर्न दहा मिनिटांमध्ये केवळ पाचच वेळा वाजू शकेल आणि प्रत्येक वेळी हॉर्न वाजविला असता त्याचा ध्वनी केवळ तीन सेकंदांपुरता मर्यादित असेल यामुळे रस्त्यावर हॉर्न वाजवणं कमी होईल आणि शांतता राहील असा उपाय महिका मिश्राने उद्योगपती आनंद महिंद्रा यांना पत्र लिहून सुचवले आहेत. महिकाने इतक्या लहान वयात सुचवलेल्या उपायांमुळे आनंद महिंद्रा यांनी आनंद व्यक्त केला आहे.

महिका मिश्राचे हे पत्र ट्विटरवर शेअर करत आनंद महिंद्रा यांनी सांगितले की, दिवसभर कामाचा धावपळ संपवून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा मिळालेल्या वेळेत काही छान पत्र वाचल्यानंतर तुमचा दिवसभराचा थकवा दूर होतो. कामाचा ताण निघून जातो. महिकासारख्या विचारांच्या पुढच्या पिढीसाठी काम करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याचं समाधान आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केलं. आनंद महिंद्रा हे महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा या वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनीचे चेअरमन आहेत. 

टॅग्स :महिंद्राकारप्रदूषण