नौकाबांधणी क्षेत्राला मुंबईने दिला आकार; लवजी नुसरवानजींचे मोठे योगदान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 06:29 AM2021-03-28T06:29:40+5:302021-03-28T06:30:06+5:30

सुहास शेलार मुंबई : जलवाहतुकीमुळे भारतात समृद्धता आली असे म्हटले जाते. हडप्पा संस्कृती हे त्याचे प्रमुख उदाहरण. हडप्पाकाळ आणि ...

Mumbai gives shape to boat building sector; Loveji Nusarwanji's great contribution | नौकाबांधणी क्षेत्राला मुंबईने दिला आकार; लवजी नुसरवानजींचे मोठे योगदान

नौकाबांधणी क्षेत्राला मुंबईने दिला आकार; लवजी नुसरवानजींचे मोठे योगदान

Next

सुहास शेलार

मुंबई : जलवाहतुकीमुळे भारतात समृद्धता आली असे म्हटले जाते. हडप्पा संस्कृती हे त्याचे प्रमुख उदाहरण. हडप्पाकाळ आणि त्यानंतरही गुजरातच्या लोथल बंदरानजीक नौकाबांधणी होत असल्याचे पुरावे आढळतात. पण, नौकाबांधणीला उद्योगाचे स्वरूप देण्याचे श्रेय लवजी नुसरवानजी यांना जाते. १७५० साली आशिया खंडातल्या पहिल्या ‘ड्राय डॉक’ची स्थापना त्यांनी मुंबईत केली आणि खऱ्या अर्थाने या क्षेत्राला आकार मिळत गेला.

मूळ सुरत इथल्या नुसरवानजी यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी एक युद्धनौका बनविण्याचे कंत्राट मिळवले. त्यांनी बांधलेली नौका पाहून ब्रिटिश इतके प्रभावित झाले की त्यांना मुंबईत येऊन नौकानिर्मिती करण्याची गळ घातली. १७३५ मध्ये नुसरवानजी मुंबईत आले आणि पुढे कायमचे मुंबईकर झाले. बॉम्बे डॉकयार्डमध्ये त्यांनी १७३६ पासून नौकाबांधणी सुरू केली.

पूर्वी ब्रिटिश सत्ताधारी युरोपीय बनावटीच्या युद्धनौका आणि मालवाहू जहाजे वापरत. ओकाच्या लाकडापासून बनविलेल्या या जहाजांचा कार्यकाळ १० ते १२ वर्षे इतकाच असे. याउलट नुसरवानजींच्या सागाच्या लाकडापासून बनविलेल्या नौका ३० वर्षांहून अधिक काळ टिकत. त्यामुळे ब्रिटिशांनी आपल्या ताफ्यात भारतीय बनावटीच्या नौकांची संख्या वाढवली. नुसरवानजी यांच्या कंपनीने दीडशे वर्षांत ब्रिटिशांसाठी ३६६ जहाजांची निर्मिती केली. एचएमएस मिंडन, एचएमएस कॉर्नवॉलिस, एचएमएस त्रिंकोमाली अशा महाकाय नौकांचा त्यात समावेश होता. मुंबईत १८१७ मध्ये बांधण्यात आलेले एचएमएस त्रिंकोमाली हे जहाज आजही सुस्थितीत आहे. दीर्घकाळ वापरात असलेले जगातील दुसरे जहाज म्हणून त्याची ओळख आहे.  इंग्लंडमधील हार्टपूल परिसरात या जहाजावर वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले आहे.

मुंबईत बनवलेल्या नौकेवर अमेरिकेच्या राष्ट्रगीताची निर्मिती
नुसरवानजी यांच्या कंपनीने १८१० साली बॉम्बे डॉकयार्डमध्ये एचएमएस मिंडन या जहाजाची निर्मिती केली. ब्रिटिश नौदलासाठी त्यांनी बांधलेले हे पहिले जहाज होय. ब्रिटिशांनी एका युद्धादरम्यान बंदी केलेल्या सैनिकांच्या सुटकेसाठी आलेल्या ‘फ्रान्सिस स्कॉट की’ या अमेरिकन वकिलाने ‘स्टार स्पॅन्गल्ड बॅनर’ ही कविता याच जहाजावर बसून लिहिली. पुढे या कवितेला अमेरिकेचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.

Web Title: Mumbai gives shape to boat building sector; Loveji Nusarwanji's great contribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.