मुंबई : गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना कोणताही त्रास होणार नाही. त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगत गणपती आगमनापूर्वीच मुंबई - गोवामहामार्गावरील खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. त्यांनी वारंवार महामार्गाचा पाहणी दौरा केला. मात्र, महामार्गावरील खड्डे काही भरण्यात आलेले नाहीत. त्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. आता याच खड्ड्यांतून मुंबईकर चाकरमान्यांना प्रवास करावा लागत आहे. ‘बसतो दणका, मोडतोय मणका’ अशी अवस्था प्रवास करणाऱ्यांची झाली आहे.
रायगडमधील पनवेलपासून पुढे ते रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबापर्यंत मुंबई - गोवा महामार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. या कामामुळे महामार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा ते संगमेश्वरमधील तूरळ भागातील महामार्गाची अवस्था दयनीय आहे. एक लेन तुकड्यात काही महिन्यांपूर्वीच चालू करण्यात आली आहे. मात्र, रस्ता अद्याप सुस्थितीत नाही. वाहनचालकांना आणि लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकी चालकांना हा रस्ता अतिशय घातक बनला आहे.
कशेडी बोगद्यामुळे वाहतुकीचा ताण कमी, ४० मिनिटांचा घाट प्रवास फक्त १० मिनिटांत
मंबई-गोवा महामार्गावरून रायगड हद्दीतून जरी वाहने मार्गस्थ झाली तरी ती कशेडी घाटात तासनतास अडकत होती. गणेशोत्सव काळात तर ही समस्या गंभीर होत असे. यावर्षी कशेडी बोगद्यातील एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी खुली करण्यात आल्याने घाटातील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. शनिवारी दिवसभर या मार्गावरून वाहनांची संख्या वाढली तरी विनाअडथळा प्रवास सुरू आहे. कोकणात जाणारे चाकरमानी शुक्रवारी रात्रीपासूनच निघाले आहेत. मात्र, ही वाहने घाटातून पटकन निघत आहेत. पूर्वी हा घाट पार करण्यासाठी ४० मिनिटे लागत असत. वाहतूककोंडी झाली तर तासनतास येथे रखडावे लागत होते.