Join us

डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण; सरकारची ग्वाही, २५ ऑगस्टपर्यंत खड्डेभरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 7:56 AM

पूर्णत्वासाठी तारीख पे तारीख असा अनुभव घेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आता  सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डिसेंबर २०२३ पर्यंतची नवीन डेडलाइन दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : पूर्णत्वासाठी तारीख पे तारीख असा अनुभव घेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आता  सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डिसेंबर २०२३ पर्यंतची नवीन डेडलाइन दिली आहे. या महामार्गावरील खड्डे २५ ऑगस्टपर्यंत भरण्यात येतील, अशी ग्वाही चव्हाण यांनी विधानसभेत दिली. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांना अडचणी येऊ नयेत म्हणून खड्डे युद्धपातळीवर बुजविण्याचे काम सुरू असल्याचे चव्हाण म्हणाले. 

मुंबई-गोवा या रखडलेल्या महामार्गाबाबत शिवसेनेचे  सुनील प्रभू यांच्यासह  शेखर निकम, जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, भास्कर जाधव, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक आमदारांनी ही लक्षवेधी मांडली होती. महामार्गाचे काम रखडल्याची कबुली चव्हाण यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक या संदर्भात पार पडली असून, या बैठकीत संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत.  

२६ ऑगस्टनंतर महामार्गाचा दौरा करू, असे चव्हाण यांनी यावेळी जाहीर केले. कशेडी आणि परशुराम घाटाच्या मातीचे सर्वेक्षण करण्यासाठी टेरी या संस्थेकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लवकरच या संस्थेकडून अहवाल प्राप्त होणार असून, या संस्थेचा अहवाल आल्यानंतर त्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली.

भूसंपादनासाठी लागलेला कालावधी आणि इतर अनेक कारणांमुळे येथील काम संथगतीने सुरू आहे. मात्र, काम तातडीने करावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल. परशुराम घाटाचे रखडलेले काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. - रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

टॅग्स :महामार्ग