खेड : गणेशोत्सवासाठीकोकणात आलेले चाकरमानी गौरी-गणपतींचे विसर्जन होताच परतीच्या प्रवासाला निघाले असल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. पावसामुळे महामार्गावर पडलेले खड्डे चुकविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर रविवारी सकाळी वाहनांची कोंडी झाली होती.यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असतानाही ई-पास, मेडिकल तपासणी, क्वारंटाईन आदी अडथळे पार करून बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासह कोकणात दाखल झाले होते.कोरोनाच्या संकटावर मात करत गणेशोत्सव साजरा करून गौरी- गणपतीला निरोप दिल्यानंतर चाकरमानी पुन्हा आपल्या नोकरीच्या ठिकाणी रुजू व्हायला निघाले आहेत. त्यामुळे गेले काही महिने शुकशुकाट असलेल्या महामार्गावर वाहनांची वर्दळ पुन्हा एकदा वाढली आहे. गेले काही दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने नेताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.खड्ड्यांमुळे वाहनांच्या वेगालाही ब्रेक लागत असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला खड्डे पडल्याने या ठिकाणी वाहने नेताना चालकांचा कस लागत आहे.जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्याचे काम रविवारी सकाळी सुरू होते. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.चाकरमान्यांसाठी गाड्यांची खास सोयकणकवली : गणेशोत्सवासाठी मुंबईहून सिंधुदुर्गात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाकडून ३० आॅगस्टपर्यंत ११७ गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये २१ गाड्यांचे ग्रुप बुकींग आतापर्यंत झाले असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.सिंधुदुर्गातील विविध बसस्थानकांवरून ठाणे, मुंबई सेंट्रल व बोरिवली आदी स्थानकांपर्यंत या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातून शुक्रवारी १५ जादा गाड्या चाकरमान्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. एसटीच्या या व्यवस्थेमुळे चाकरमान्यांची चांगली सोय झाली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवातही मुंबईवरून चाकरमान्यांना गावी येण्यासाठी एसटी महामंडळाकडून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. १२ आॅगस्टपर्यंत या जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या जादा गाड्यांचा अनेक चाकरमान्यांनी लाभ घेतला. आता या चाकरमान्यांना परत मुंबईला जाण्यासाठी सिंधुदुर्गातून जादा गाड्या सोडण्यास सुरुवात झाली आहे. ३० आॅगस्टपर्यंत याजादा गाड्या सोडल्या जाणारआहेत.कणकवली, सावंतवाडी, मालवण, देवगड, विजयदुर्ग, फोंडाघाट, वेंगुर्ला, कुडाळ आदी बसस्थानकांवरून या गाड्या मुंबईला सोडण्यात येत आहेत. एसटीच्या गाडीमध्ये २२ प्रवाशांना घेऊन या गाड्या सोडण्यात येत आहेत. या गाड्यांमधील प्रवाशांकडून सर्व नियमांचे पालन होत आहे.चाकरमान्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवरून ९६ गाड्या तर ग्रुप बुकींगच्या २१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रवाशांनी मागणी केल्यास त्यांच्या गावातून ग्रुप बुकींगच्या माध्यमातून एसटीच्या गाडीची मुंबई येथे जाण्यासाठी सोय उपलब्ध केली जाणार आहे.गाड्या उपलब्ध : सिंधुदुर्गातील बसस्थानकांवरून थेट प्रवाशांना घेऊन या गाड्या मुंबईला जाणार आहेत. त्यामुळे अद्यापही गाड्यांचे प्रवाशांकडून आरक्षण केले जात आहे. तसेच ग्रुप बुकींगसाठीही गाड्या उपलब्ध केल्या जात आहेत. चाकरमान्यांना मुंबईला परत जाणे सोयीचे व्हावे यासाठी एसटी महामंडळाकडून या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत.
मुंबई - गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी अडवली वाहनांची वाट, चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 6:33 AM