मुंबई - मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे बुजवण्याचे काम 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार, अशी ग्वाही राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात दिली आहे. तसंच 10 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकराने काम पूर्ण केल्याचा अहवाल सादर करावा, असा आदेशही हायकोर्टानं राज्य सरकारला दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. परिणामी, या महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढते. त्यामुळे या महामार्गावरील रस्ते दुरुस्त करण्याचे व खड्डे बुजविण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
''मुंबई-गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2010 पासून कासवगतीने सुरू आहे. या महामार्गावर अनेक खड्डे पडले आहेत. मात्र, याची दखल सरकारने घेतलेली नाही. हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव असल्याने, त्यानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढेल. मात्र, या रस्त्यावर खड्डे असल्याने वाहतूककोंडी होईल व अपघातही होऊ शकतो. त्यामुळे या महामार्गाची व खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश सरकारला द्यावेत'', अशी विनंती पेचकर यांनी न्यायालयाला केली आहे.
(मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य)
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करणार,अशी ग्वाही यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून हायकोर्टात देण्यात आली होती. मात्र, हा दावा फेल असल्याचं याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात सांगितलं होतं. तसंच खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्यानं रस्त्याचं अधिक नुकसान होत असल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला होता.