Join us  

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बनतोय धोकादायक

By admin | Published: May 11, 2016 2:01 AM

मुंबई-गोवा या महामार्गावर दिवसेंदिवस घडणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. रोज कुठे ना कुठे तरी अपघात घडताना दिसत आहेत.

रोहे : मुंबई-गोवा या महामार्गावर दिवसेंदिवस घडणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. रोज कुठे ना कुठे तरी अपघात घडताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणावर वर्दळ असणाऱ्या या महामार्गावर वाहनांचा मर्यादेपेक्षा अधिक असणारा वेग अपघाताचे मुख्य कारण ठरत आहे. तसेच महामार्ग रुंदीकरणाचेही काम सुरू असल्याने याचाही अडथळा वाहतुकीला होत आहे.सध्या महामार्ग रुंदीकरणाचेही काम हाती घेण्यात आले असल्याने ठिकठिकाणी रस्त्यालगत विखुरलेले बांधकाम साहित्य, अडथळा ठरत असलेले डोंगर फोडण्याचे चालू असलेले काम, रस्त्यालगत असणारे मातीचे ढिगारे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यातच महामार्गाचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी वळविण्यात आलेल्या वाहतूक मार्गावर काही ठिकाणी डायव्हर्सनच्या बोर्डचा अभाव आदी कारणांमुळे वेगवान वाहनांना एकाएकी वेगावर नियंत्रण मिळविणे अवघड होताना दिसत आहे. वाढते औद्योगिकीकरण व नागरिकरणामुळे तसेच कोकण प्रांताचा पर्यटनाच्या दृष्टीने होत असलेला विकास यामुळे महामार्गावरील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने रहदारीचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे चौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत महामार्ग अपुरा पडत आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसणे, अतिघाई, मादक पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे, रहदारीच्या नियमांचे पालन न करणे तसेच ठिकठिकाणी असणारे खराब रस्ते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.