Join us  

‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गणपतीपूर्वी खड्डेविरहित करणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 4:48 AM

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्व खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरण्यात येतील, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. गणेशोत्सवाव्यतिरिक्तही लोक या महामार्गाचा वापर करतात. त्यांना चांगले रस्ते उपलब्ध करून द्यायचे नाही का, असा सवालही न्यायालयाने राज्य सरकारला केला.व्यवसायाने वकील असलेले ओवेस पेचकर यांनी याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई-गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०१० पासून कासवगतीने सुरू आहे. या महामार्गावर अनेक खड्डे पडले आहेत. मात्र, याची दखल सरकारने घेतलेली नाही. हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव असल्याने, त्यानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढेल. मात्र, या रस्त्यावर खड्डे असल्याने वाहतूककोंडी होईल व अपघातही होऊ शकतो. त्यामुळे या महामार्गाची व खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी विनंती पेचकर यांनी न्यायालयाला केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या सुनावणीत न्यायालयाने या महामार्गाच्या देखभालीस व खड्ड्यांच्या दुरुस्तीला जबाबदार कोण? याचे उत्तर राज्य सरकारला देण्याचे निर्देश दिले होते. त्यावर सोमवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी हा महगामार्गाची देखभाल, खड्डे दुरुस्तीची जबाबदारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर असल्याचे न्यायालयाला सांगितले.राज्य सरकारची हद्द इंदापूरच्या पुढे सुरू होते. सरकारच्या अखत्यारित येत असलेल्या २४३.८७ किमी. महामार्गापैकी ४५.०४ किमी. पट्ट्यात खड्डे पडले असून, पैकी १९.८१ किमी. पट्ट्यातील खड्डे भरण्यात आले आहेत. उर्वरित खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत भरण्यात येतील, अशी माहिती सरकारी वकील निशा मेहरा यांनी न्यायालयाला दिली.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित एकूण १२१. ४०० किमी. महामार्ग येत असून, त्यापैकी ७.५० किमी. पट्ट्यात खड्डे पडले असून, ५.५०० किमी. पट्ट्यातील खड्डे भरले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असलेल्या महामार्गावर अत्यंत कमी प्रमाणात खड्डे पडले असून, येथे वाहतूक सुरळीत असते, असा शेरा प्राधिकरणाने न्यायालयाला सादर केलेल्या अहवालात मारला आहे.ज्या अधिकाºयाने हा अहवाल सादर केला आहे, तो याबाबत गंभीर आहे का? खड्ड्यांचे प्रमाण कमी आहे आणि वाहतूक सुरळीत आहे, यावर ते ठाम आहेत का, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला केला.तसेच महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवाआधीच भरण्यात येतील, या सरकारच्या आश्वासनावर न्यायालयाने आक्षेप घेतला. ‘गणेशोत्सवापूर्वीच का खड्डे भरण्यात येतील? एरवीही या महामार्गाचा वापर केला जातो. त्या वेळी चांगले रस्ते उपलब्ध करून द्यायचे नाही का?’ असे म्हणत, न्यायालयाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे भरण्यास जबाबदार कोण व त्या कामावर देखभाल करण्याची जबाबदारी कोणाची, याबाबत सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :खड्डेमुंबईगोवारस्ते सुरक्षारस्ते वाहतूक