ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - कोकण रेल्वेनं चाकरमान्यांच्या सेवेत नवी ट्रेन दाखल केली आहे. ताशी तब्बल 200 किलोमीटर वेगाने धावणारी देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरुद मिरवणारी ‘तेजस’ एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गावर अखेर धावली आहे. दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी सुटलेली तेजस एक्स्प्रेस रात्री 12.35 वाजता करमाळी(गोवा)त दाखल होणार आहे. तेजस एक्स्प्रेस सात स्टेशनवर थांबणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ आणि करमाळी अशा स्थानकांवरच या ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे रविवारी शर्मा आणि अन्य अधिकाऱ्यांनी ‘तेजस’ एक्स्प्रेसचे (मुंबई-करमळी) निरीक्षण केले होते. त्या वेळी ते म्हणाले होते की, ‘गेली तीन वर्षे ‘तेजस’ एक्स्प्रेससाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.’ प्रवाशांच्या गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या गाडीतून प्रवास करण्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मुंबई-करमाळी (गोवा) या मार्गावर ‘तेजस’ एक्स्प्रेस धावत आहे. ‘तेजस’मध्ये एक्झिक्युटिव्ह बोगीत 56 सीट आणि एसी बोगीत 936 सीट आहेत. प्रत्येक डब्यात 6 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ‘तेजस’ एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना अल्पोपहाराची सेवाही उपलब्ध करून दिली आहे. आयआरसीटीसीकडून ही सेवा सशुल्क देण्यात येणार आहे. ‘तेजस’मध्ये सायंकाळच्या अल्पोपहारात दाबेली, डाएट चिवडा, सामोसा, कोथिंबीर वडी मिळणार आहे. सकाळी ब्रेड बटरसह उपमा, पोहे, इडली, वडा मिळणार आहे.
मुंबई टू गोवा आता सुसाट, अखेर तेजस धावली!
By admin | Published: May 22, 2017 6:13 PM