भैय्यूजी महाराजांच्या ताफ्यातील गाडीने रस्त्यावरील फुलविक्रेत्याच्या पायावरून नेली गाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 09:14 AM2018-04-28T09:14:59+5:302018-04-28T09:14:59+5:30
भैय्यूजी महाराज यांच्या ताफ्यातील गाडी फुल विक्रेत्याच्या पायावरून गेल्याने फुल विक्रेता जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई- भैय्यूजी महाराज यांच्या ताफ्यातील गाडी फुल विक्रेत्याच्या पायावरून गेल्याने फुल विक्रेता जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कुर्ला पूर्व भागात ही घटना घडली. फुलविक्रेत्याच्या पायावरून गेलेली गाडी ही राजेश पिल्ले नावाच्या व्यक्तीची असून ते पुण्यातील व्यावसायिक तसंच भाजपाचे नेते आहेत. अपघात झाला तेव्हा ती गाडी पिल्ले यांचा ड्रायव्हर चालवत होता. फुलविक्रेत्याच्या पायावरून गाडी नेल्यावरही ड्रायव्हरने गाडी थांबविली नाही, असा आरोप जखमी फुलविक्रेत्याने केला आहे. हॉस्पिटलची बीलं भरणं आता शक्य होत नसल्याचं त्या फुलविक्रेत्याने म्हटलं आहे.
23 एप्रिल रोजी कुर्ला पूर्व विधानसभा सदस्य मंगेश कुडाळकर यांनी नेहरुनगरमधील केदारनाथ मंदिराच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम ठेवला होता. अनेक बड्या नेत्यांना या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं होतं. भैय्यूजी महाराज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे होते.
कार्यक्रमानंतर भैय्यूजी महाराज व त्यांचे सहकारी पुण्याला परतत असताना रस्त्यामध्ये भैय्यूजी महाराज यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील वोल्वो गाडीने नेहरूनगर येथे रस्त्यावरून जाणाऱ्या मनोज गडकरी या फुलविक्रेत्याच्या पायावरून गाडी नेली. गाडीने धडक दिल्यावर त्या ड्रायव्हरने गाडी थांबविली नाही. जखमी मनोज गडकरी यांना त्यांच्या पत्नीने चुनाभट्टी येथील सोमय्या हॉस्पिटलमध्ये नेलं. 'माझे वडील रस्ता ओलांडत असताना त्यांच्या पायावरून गाडी गेली. परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमधून ही घटना स्पष्टपणे दिसते आहे. पायाला गंभीर दुखापत झाली असून पायाचं बोट व पाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा (अँकल) फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्या पायावर दोन शस्त्रक्रीया झाल्या असून डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. वडील अजूनही हॉस्पिटलमध्ये असून आत्तापर्यंत आम्ही दीड लाख रुपये उपचारावर खर्च केले आहेत, अशी माहिती मनोज गडकरी यांचा मुलगा जय गडकरी याने दिली आहे. सोन गहाण ठेऊन आम्ही पैसे जमा केले असल्याचंही त्याने सांगितलंय
पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दाखवूनसुद्धा त्यांनी काहीही तपास केला नाही, असा आरोप गडकरी कुटुंबीयांनी केला आहे. 'आरोपीने कार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण करावं याची ते वाट पाहत आहे. याप्रकरणी त्यांनी चौकशीही करण्याती तसदी घेतली नसावी, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. दरम्यान,'आम्ही आरोपीला अजून अटक केली नाही. पण गुन्ह्याची नोंद केली आहे. कार भैय्यूजी महाराज यांच्या ताफ्यातील होती पण त्यांचा या घटनेत काहीही सहभाग नाही, अशी प्रतिक्रिया नेहरूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय काळे यांनी दिली आहे.
दरम्यान, आमदार कुडाळकर यांनी गडकरी यांची भेट घेऊन त्यांना 5 हजार रुपयांची मदत केल्याचं मुंबई मिररला सांगितलं आहे. तसंच पुढेही गरज लागली तर सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं ते म्हणाले.