गोराईचं अतिक्रमण हटवलं, आता शिवाजी महाराजांचं 'वॉर म्युझियम' उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 06:20 PM2023-06-06T18:20:32+5:302023-06-06T18:33:39+5:30
मुंबईतील सरकारी जमिनींवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम सुरु केली आहे.
मुंबई - रायगडावर आज मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. तर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तिथीप्रमाणे दोन दिवसांपूर्वीच शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला होता. आज पुन्हा एकदा सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन साजरा होत आहे. याच दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याचे आणि आरमाराचे प्रेरणा देणारे वॉर म्युझियम मुंबईत साकारले जाणार आहे. त्यासाठी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.
मुंबईतील सरकारी जमिनींवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम सुरु केली आहे. आज गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. तसेच, येणाऱ्या काळात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे, जेणेकरून पुढील पिढ्यांना छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल, असे मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. लोढा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. अतिक्रमण हटविण्यात आल्याचे फोटो आणि व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे.
मुंबईत होणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे वॉर म्युझियम!
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) June 6, 2023
मुंबईतील सरकारी जमिनींवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम सुरु केली आहे. आज गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. येणाऱ्या काळात त्या ठिकाणी… pic.twitter.com/gIytdTnwXk
दरम्यान, राज्यातील गडकिल्ले इतिहासाचे साक्षीदार असून नव्या पिढीला त्याचे महत्त्व समजावे यासाठी किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनावर राज्य शासन भर देत आहे, असे मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांच्या प्रमाणबद्ध प्रतिकृतींचे प्रदर्शन मंत्रालयात भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यटन मंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करण्यात आले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्यांच्या प्रमाणबद्ध प्रतिकृती प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या दोन्ही किल्ल्यांचा इतिहास, आरमाराची माहिती देण्यात आली आहे. सोमवार दि. ५ जून ते मंगळवार दि. ६ जून २०२३ या दोन दिवसांच्या कालावधीत हे प्रदर्शन शिवप्रेमींना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाची निर्मिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली आहे.