Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार- राज्यपाल रमेश बैस
By मनोहर कुंभेजकर | Published: July 4, 2023 02:51 PM2023-07-04T14:51:24+5:302023-07-04T14:51:49+5:30
Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याच्या अनुषंगाने राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाचे शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली.
- मनोहर कुंभेजकर
महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याच्या अनुषंगाने राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाचे शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. या बैठकीसाठी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपा आमदार रमेश पाटील यांनी पुढाकार घेतला होता.
या बैठकीमध्ये आमदार रमेश पाटील यांनी महाराष्ट्रातील विस्तारित क्षेत्रातील आदिवासी कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी इ. जमातींना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देताना जात पडताळणी समितीकडून कशाप्रकारे जाणीवपूर्वक भेदभाव केला जातो आणि सामाजिक आरक्षणापासून व इतर शासकीय लाभापासून आदिवासी कोळी जमातीला कसे वंचित ठेवले जाते हे राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतन पाटील यांनी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण या विभागातील अनुसूचित जमातीतील बांधवांची जात वैधता प्रमाणपत्राची प्रकरणे जात पडताळणी समितीमार्फत जाणीवपूर्वक अवैध ठरवण्यात येतात, परंतू त्यानंतर न्यायालयात अपील केल्यानंतर या अनुसूचित जमातीतील बांधवांची जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरल्याची अनेक उदाहरणे दाखवून दिली. तसेच जात पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीवर बंधने आणली पाहिजेत असे सांगून याबाबतीत आपल्या मार्फत व सरकारमार्फत मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्यास गोरगरीब जनतेला न्यायालयात धाव घेण्याची आवश्यकता भासणार नाही याकडे राज्यपालांचे लक्ष वेधले.
प्राध्यापक शरण खानापुरे यांनी टीएसपी आणि ओटीएसपी मध्ये भेदभाव करून ओटीएसपी क्षेत्रातील साडेपाच टक्के आदिवासी जमातींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याने त्यावर आपल्या मार्फत निर्देश व्हावेत अशी विनंती राज्यपाल महोदयांना केली.
शिष्टमंडळाचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्यपाल महोदयांनी आपण दर्शविल्याप्रमाणे आदिवासी कोळी समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी माझ्या वतीने आदिवासी मंत्री व आदिवासी विकास विभागास निर्देशित करण्यात येईल असे सांगून यासंदर्भात विस्तृत बैठक आयोजित केली जाईल. तसेच महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी इ. जमातीच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी प्रकाश बोबडी, राजहंस टपके, देवानंद भोईर, शिवशंकर फुले, सतीश धडे, अविनाश कोळी, मुकेश सोनवणे, गीतांजली कोळी, बाळासाहेब सैंदाणे, शंकर मनाळकर, राम सुरडकर, धीरज सनगाळे, दत्तात्रय सुरवसे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.