'मुंबई पदवीधर'साठी राणेंचो बाण; मिलिंद नार्वेकरांना लक्ष्य करत शिवसेनेवर शरसंधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 04:39 PM2018-06-16T16:39:51+5:302018-06-16T16:42:01+5:30
नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील छत्तीसचा आकडा राजकीय वर्तुळात सुपरिचित आहे......
मुंबईः शिवसेना आणि नारायण राणे आमनेसामने उभे ठाकल्यानं विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची आणि चांगलीच रंगतदार होणार आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांच्या ट्विटनं या लढाईचा शंख फुंकला गेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकरांना लक्ष्य करत त्यांनी मतदार यादीतील गोंधळाकडे लक्ष वेधलं आहे.
मालाड विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत मिलिंद नार्वेकर यांच्या पत्नीचं नाव सहा वेळा असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. ट्विटसोबत त्यांनी या मतदारयादीचे फोटोही शेअर केलेत. त्यात मीरा मिलिंद नार्वेकर हे नाव सहा वेळा दिसतंय. त्यावर बोट ठेवत, शिवसेना पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अशी जिंकणार का?, असा खोचक प्रश्न नितेश राणेंनी केली आहे. मतदारयाद्यांमध्ये काही नावं पुन्हा पुन्हा आहेत, तर काही मतदारांची नावंच नाहीत, असंही त्यांनी नमूद केलंय. या याद्यांची फेरतपासणी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केलीय.
Uddhav Thackeray’s PA Milind Narvekers wife’s name comes up 6 times in Malad Vidhan Sabha list..pin code 64.. so this how Sena is goin to win the Mumbai graduate seat? pic.twitter.com/doZHFOO7io
— nitesh rane (@NiteshNRane) June 15, 2018
Voting list has to be checked by the election commission as there are many instances of voters name gettin repeated or name not even listed.
— nitesh rane (@NiteshNRane) June 15, 2018
दरम्यान, नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील छत्तीसचा आकडा राजकीय वर्तुळात सुपरिचित आहे. राणेंनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला होता, तेव्हाही नार्वेकरच त्यांच्या रडारवर होते.
मुंबई, कोकण मतदारसंघांवर नजरा
मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे या जागांसाठी २५ जून रोजी मतदान होणार असून २८ जूनला निकाल जाहीर होईल. त्यात मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजपा आणि शिवसेनेनं प्रतिष्ठेची केली आहे, तर मुंबईची निवडणूक शिवसेनेसाठी 'स्वाभिमाना'ची आहे. माजी मंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाने राजू बंडगर यांना पाठिंबा जाहीर केला असून भाजपाचीही मदत त्यांना मिळू शकते. त्यामुळेच, शिवसेनेनं डॉ. दीपक सावंत यांच्याऐवजी विलास पोतनीस या नव्या शिलेदाराला रिंगणात उतरवलं आहे.
मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातही शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यात 'टफ फाइट' होऊ शकते.
'कोकण पदवीधर'मध्ये काँटे की टक्कर
निरंजन डावखरे - भाजपा
संजय मोरे - शिवसेना
नजिब मुल्ला - राष्ट्रवादी
'मुंबई पदवीधर'मध्ये महामुकाबला
विलास पोतनीस - शिवसेना
राजू बंडगर - स्वाभिमान पक्ष पुरस्कृत उमेदवार
राजेंद्र कोरडे - शेकाप (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा)
जालिंदर सरोदे - शिक्षक भारती
दीपक पवार - अपक्ष
मुंबई शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढाई
कपिल पाटील - शिक्षक भारती (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा)
शिवाजी शेंडगे - शिवसेना
अनिल देशमुख - भाजपा
'नाशिक शिक्षक'मध्ये घराणेशाही
किशोर दराडे - शिवसेना (विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडेंचे भाऊ)
अनिकेत पाटील - भाजपा (माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे चिरंजीव)
संदीप बेडसे - महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी