मुंबई - स्वस्तात म्हाडाच्या फ्लॅटसाठी आजोबांना जमापुंजी गमावण्याची वेळ ओढवली आहे. यामध्ये आजोबांची ४२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संतोष मिश्रा, अरुण मिश्रा, मोहन मिश्रा या त्रिकुटाविरुद्ध गुरुवारी गुन्हा नोंदवत घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहेत.
घाटकोपर येथील रहिवासी असलेल्या ७३ वर्षीय तक्रारदार रमेश यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे याच परिसरात ईलेक्ट्रीक साहित्य विक्रीचे दुकान होते. लाल बहादुर शास्त्री मार्गाच्या रुंदीकरणात दुकान तोडले गेले. त्यांच्या घरात २०१५ मध्ये संतोष मिश्रा, अरुण मिश्रा आणि मोहन मिश्रा भाडेतत्वावर राहण्यास होते. या तिघांनी त्यांचा म्हाडामध्ये एक मोठा अधिकारी ओळखीचा असल्याने त्याच्या मार्फत स्वस्तात म्हाडाचा फ्लॅट घेऊन देण्याचे आमीष दाखवले.
पवई, तुंगा गाव येथे ७०० चौरस फुटांचा फ्लॅट ६५ लाख रुपयांत देण्याचे आमीष दाखवून ४२ लाख ५० हजार रुपये उकळले. त्यानंतर ना त्यांना फ्लॅट मिळाला. ना दिलेले पैसे परत मिळाले. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच आजोबांनी पोलिसांत धाव घेतली. जून २०१५ ते ९ डिसेंबर २०१९ दरम्यान ही फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.