Aarey Green Toll : मुंबईतीलआरे परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. पर्यावरण विभाग आरेच्या जंगलातून जाणाऱ्या वाहनांवर ग्रीन टोल लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आरेच्या इको सेंसिटिव्ह झोनमधून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना चांगलाच चाप बसणार आहे. वनविभाग आरेच्या जंगलातून प्रवास करणाऱ्या वाहनांवर टोल लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. दररोज साधारणत: २५ हजारांहून अधिक वाहनांची आरेमध्ये वर्दळ असते. आरेच्या जंगलामध्ये वाहनांची संख्या अधिक वाढली असून त्यामुळे वायू प्रदूषणात मोठी भर पडत आहे.
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा मार्ग प्रवाशांना सोयीचा वाटतो. हा मार्ग पश्चिम द्रुतगती महामार्गावरून मरोळ तसेच पवईला जोडला जातो. त्यामुळे दिवसभरामध्ये असंख्य वाहनधारक या मार्गाचा वापर करतात. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे आरेमधील प्रदुषणात भर पडतेच शिवाय वन्यजीवांचा सुरक्षा मुद्दा सुद्धा ऐरणीवर आहे.
वनविभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय :
यापूर्वी २०१४ मध्ये वनविभागाने ग्रीन टोलचा प्रस्ताव आणला होता. पण आरेमधील मुख्य रस्ता हा मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने ग्रीन टोलचा प्रस्ताव रद्द करण्यात आला.
पर्यावरण प्रेमींकडून निर्णयाचे स्वागत :
जवळपास ३ हजार एकर इतका विस्तार असलेल्या या जंगलामुळे मुंबईच्या पर्यावरणात संतुलन राहते. त्यामुळे वनविभागाच्या या निर्णयाचे पर्यावरण प्रेममींकडून स्वागत करण्यात येत आहे.