Mumbai: मुंबईतील मैदाने, उद्याने ‘डेंजर झोन’मध्ये

By सचिन लुंगसे | Published: June 28, 2023 12:47 PM2023-06-28T12:47:43+5:302023-06-28T12:48:24+5:30

Mumbai: मुंबई शहर आणि उपनगरांची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून, वाढत्या लोकसंख्येला पुरेशा मोकळ्या जागा आता शिल्लक राहिलेल्या नाहीत, तसेच ज्या शिल्लक राहिल्या आहेत, त्या ठिकाणच्या उद्यानांची, मनोरंजन उद्यानांची आणि खेळाच्या मैदानांची पार रया गेली आहे.

Mumbai: Grounds, parks in Mumbai in 'danger zone' | Mumbai: मुंबईतील मैदाने, उद्याने ‘डेंजर झोन’मध्ये

Mumbai: मुंबईतील मैदाने, उद्याने ‘डेंजर झोन’मध्ये

googlenewsNext

- सचिन लुंगसे  
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून, वाढत्या लोकसंख्येला पुरेशा मोकळ्या जागा आता शिल्लक राहिलेल्या नाहीत, तसेच ज्या शिल्लक राहिल्या आहेत, त्या ठिकाणच्या उद्यानांची, मनोरंजन उद्यानांची आणि खेळाच्या मैदानांची पार रया गेली आहे. यामध्ये कहर म्हणजे सुशोभीकरण अन् सौंदर्यीकरणाच्या नावाखाली हितसंबंधितांनी आपापल्या टक्केवारीला संरक्षित केल्याने, तर मोकळ्या जागा, मैदाने उद्याने यांचाही श्वास पुरता कोंडला आहे. तशात अनेक अतिक्रमणांचा वेढा, दुरुपयोग आणि दत्तक धोरणाखाली महापालिकेकडून ज्या संस्थांनी जागा घेतल्या आहेत, त्यांची मक्तेदारी, यामुळे लहान मुलांनी कुठे खेळायचे, ज्येष्ठ नागरिकांनी फेरफटका कुठे मारायचा, असे अनेक सवाल क्रीडा क्षेत्रासह मैदान वाचविणाऱ्या कार्यकर्त्यांना पडले आहेत.  

शिवाजी पार्कात कार्यक्रम नको; खेळ हवेत 
मुंबई : दादरसारख्या मध्यवर्ती भागातील शिवाजी पार्क या प्रसिद्ध मैदानाने लोकांचे नेहमीच लक्ष वेधले आहे. मात्र, त्यात असणाऱ्या विविध समस्यांकडे  लक्ष द्यायची तयारी नसल्याचे चित्र आहे.   विविध भरगच्च कार्यक्रम मैदानात होत असल्याने, मैदान नक्की खेळासाठी आहे की कार्यक्रमांसाठी आहे, असा सवाल स्थानिकांपुढे नेहमीच उभा राहतो. मैदाने ही मुलांना खेळासाठी राखीवच असली पाहिजेत; याकडे वारंवार लक्ष वेधत भरगच्च अशा कार्यक्रमांचे आयोजन मैदानावर करत, त्याची रया घालविली जात आहे.
 शिवाजी पार्क मैदानालाही बांधकामाचा वेढा पडला आहे. मैदानात कोणत्याही प्रकाराचे बांधकाम असता कामा नये. 
मैदान दत्तक दिले की, त्यावर कार्यक्रम होतात.  मैदान किंवा हबमध्ये सर्वसमावेशक खेळ आहेत, असे काहीच तयार केले नाही. मुलांचा सर्वांगीण विकास होईल, असे महापालिका काहीच करत नाही, अशी खंत दादर येथील रहिवासी मिलिंद पांचाळ यांनी व्यक्त केली.

हे कुठे आहे ?
उद्यान / मैदान / मनोरंजन मैदाने नागरिकांना खुली असण्याच्या वेळेतील बदल दर्शविणारे फलक उद्यान / मैदान / मनोरंजन मैदाने यांच्या दर्शनीभागावर लावलेली असणे अपेक्षित आहे. मात्र, तसे फार कमी ठिकाणी असते. सुदृढ आरोग्यासाठी नागरिकांची संख्या लक्षात घेता उद्याने व मैदानांमध्येही फलक लावावेत.

दत्तक मैदानाची परतीची ‘सोयरिक’
मुंबई : दत्तक धोरणानुसार नाममात्र मूल्यात जर एखाद्या संस्थेला मैदान दत्तक दिले गेले आणि तरीही संस्थेने त्या मैदानाचा व्यावसायिक वा नफेखोरी पद्धतीने त्यातून पैसे कमावले तर त्यावेळी त्या मैदानासाठी मिळालेल्या रकमेत महापालिकेलाही वाटा मिळायला हवा, अशी तरतूद करायला हवी. मात्र, याकडे फार लक्ष दिले जात नसले तरी पालिका दत्तक दिलेली मैदाने ‘सोयी’नुसार परत घेत असल्याचेही मैदान बचाव समितीकडून सांगण्यात आले.
 मैदानाच्या कामाचे कंत्राट देताना प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली असते. महापालिका, कंत्राटदार, राजकीय प्रतिनिधी आणि संस्था अशा सगळ्यांनाच केवळ टक्केवारीमध्ये रस असल्याने मैदानाचे काहीच होत नाही, दुसरीकडे उद्यानांच्या प्रवेशद्वारांची अवस्था वाईट असते. मैदानांत माती कमी आणि डेब्रिज अधिक असते, तर काही मैदानात पार्किंग केले जाते. मैदानांना अतिक्रमणांचा विळखा आहे, तर मैदानांत गर्दुल्ले आणि प्रेमीयुगलांचा अधिक वावर असतो. काही मैदानांत गरज नसतााही वॉकिंग ट्रॅक बांधले जातात. त्याचप्रमाणे मैदाने दत्तक घेतली जातात त्यात काही संस्था आपला मनमानी कारभार करत असल्याचे चित्र दिसत असते. मात्र, या सर्वांत मैदाने मात्र पोरकीच राहात असल्याने  मैदानाचे धोरण केवळ कागदी झाले आहे.

आपल्याकडे मूळ शोधले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. मैदानाची जमीन समतल करणे, हिरवळ लावणे, सभोवताली झाडे लावणे ही मूलभूत कामे केली तरी खूप आहे. मात्र, येथे पेव्हर ब्लॉकचे मार्ग तयार करतात. हे कोणाच्या फेव्हरसाठी असा प्रश्न आहे.   महापालिकेच्या मैदानांसाठीचे दत्तक धोरण ही कल्पना चांगली आहे, पण ती राबवली कशी जाते ते महत्त्वाचे आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- भास्कर सावंत, अध्यक्ष, मैदान बचाव चळवळ

शिवाजी पार्क मैदानाची सध्याची स्थिती पाहून खूप दु:ख होते. सकाळच्यावेळी येथे निश्चित खेळाडूंची मोठी संख्या असते. मात्र, संध्याकाळनंतर अनेक युवक मद्यपान, धूम्रपान करताना दिसतात. हे अत्यंत चुकीचे असून एक खेळाडू म्हणून मला खूप वाईट वाटते. कारण, प्रत्येक मैदान हे आमच्यासाठी मंदिर आहे. शिवाय या मैदानाला छत्रपती शिवाजी महाराज मैदान असे नाव आहे. त्यामुळे सर्वप्रथम या नावाचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. प्रशासनाकडे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, अनेक मैदानांचे सुशोभीकरण होते. परंतु, त्यानंतर केलेल्या कामांची निगा राखली जात नाही. मैदानांची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही देशाचे नाव खेळांमुळे मोठे होते आणि प्रत्येक खेळाडू हा अशा मैदानातूनच घडत असतो. त्यामुळे सर्व मैदानांकडे सरकारने विशेष लक्ष द्यावे.    - विशाल माने, कबड्डीपटू

मेट्रोपासून ‘आझादी’ कधी? आंदोलनांची जागाच बदलली
मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे सुरू असून, दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या अशा आझाद मैदानाची जागा या मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात आली आहे. मुंबईच्या वेगवाढीसाठी मेट्रो असल्याचे चित्र उभे करण्यात आले आहे आणि त्यामुळे आझाद मैदानात होणारी पूर्वीची आंदोलने, सभा यांची जागा बदलली आहे. आता येथील कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनला मैदान सुस्थित करावे लागणार आहे.
 कुलाबा - वांद्रे - सीप्झ हीा भुयारी मुंबई मेट्रो लाइन ३ प्रकल्पांकरिता आझाद मैदानातील ३० हजार ७७६ चौरस मीटर जागा पुढील तीन वर्षांकरिता तात्पुरत्या स्वरुपात वापरण्यास १६ डिसेंबर २०२१ रोजी मुदतवाढ दिली गेली. आणखी काहीकाळ त्यामुळे मेट्रोच्या हाती मैदान राहील, मात्र मेट्रो रेल्वेचे काम कधी पूर्ण होते, ते मेट्रो रेल्वेच्या कामाच्या गतीवर अवलंबून राहील आणि त्यावरच आझाद मैदान सुस्थितीत कधी येईल ते ठरेल, इतकीच सध्याची वस्तुस्थिती आहे.   बांधकाम विभागाच्या ताब्यातील आझाद मैदानातील काही जागा मेट्रोला पाच वर्षांकरिता हस्तांतरित केली होती. मात्र, अनेक अडचणींमुळे काम पूर्ण होत नसल्याने,  मुदतवाढ दिली गेली. 
आंदोलकांचे हक्काचे ठिकाण
आझाद मैदान हे खरेतर आंदोलकांचे हक्काचे ठिकाण होय. देशासह राज्यभरातून येणारा आंदोलक आपल्या मागण्यांपायी आझाद मैदानाचा आसरा घेतो. न्यायासाठी आवाज देतो. आज याच आझाद मैदानातील आंदोलनांची जागा आता या कामामुळे लगतच स्थलांतरित झाली आहे.

मालाड - मैदान दत्तक घेतले आहे; विकत नाही!
मुंबई : महापालिकेकडून मैदान देखभाल-दुरुस्तीसाठी दत्तक गेल्यानंतर मैदान हे मैदान न राहाता भाड्याने जागा देण्याची वस्तू होते. त्या मैदानाला दत्तक घेणाऱ्या संबंधित संस्थेची मनमानी सुरू होते. तशात राजकीय अभयामुळे संस्थेच्या कारभारावर बोलूही दिले जात नाही. पश्चिम उपनगरात मालाडमधील मैदानांची हीच स्थिती असून, त्याकडे महापालिकेचा व्यवस्थित कानाडोळा होत असल्याचे आढळत आहे.
मालाड पश्चिमेला लिबिर्टी गार्डन येथे चाचा नेहरू मैदान आहे. येथे मुलांची गर्दी असते. शहाजी राजे क्रीडांगण आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान आहे. मात्र, स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांनी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मैदाने दत्तक घेतली की, त्याचा गैरवापर केला जातो. मध्यंतरी महापालिकेने दत्तक दिलेली मैदाने पुन्हा आपल्याकडे घेण्यास सुरुवात केली. 
 महापालिका मैदानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. ही जबाबदारी तर संस्थांची आहे. मात्र, याकडे लक्ष दिले जात नाही. तक्रार केली की, महापालिकेकडून त्रास दिला जातो. राजकीय पक्षांकडून त्रास दिला जातो. खोटी प्रकरणे नोंदविली जातात, असे फाइट फॉर राइट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी सांगितले.

विलेपार्ले - मैदान आमच्या हक्काचे!
मुंबई : विलेपार्ल्यातील इर्ला येथे असलेल्या महापालिकेच्या मैदानावर स्थानिक राजकारण्यांकडून हक्क सांगितला जातो. अशा वेळी पालिकेने कुंपण घालून हे मैदान ताब्यात घ्यावे. इतकेच नव्हे, तर सुरक्षारक्षक नेमावा. मात्र, दुर्दैवाने यापैकी काहीच होत नसल्याने, नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.मैदानांसाठी मुंबई महापालिकेचे क्रीडांगण धोरण आहे, त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात मात्र राजकीय हस्तक्षेप असल्याने, अशी मैदाने केवळ नावाला राहतात आणि कालांतराने ती झोपडपट्टी पुनर्विकासाच्या घशात घालण्यात येतात. दोन हजार कोटी रुपयांची सौंदर्यीकरणासाठी तरतूद आहे.

गोवंडी - मैदानात विकासाचे खेळ कशाला?
मुंबई : मुंबईच्या पूर्व उपनगरात गोवंडी, चेंबूर, देवनारसह लगतच्या परिसरातही मैदानाची फार काही चांगली अवस्था नाही. जी मैदाने, उद्याने आहेत त्यात विकासाच्या नावाखाली, सेवासुविधा देण्याच्या नावाखाली बांधकाम केले जात आहे. 
 सेवासुविधा देताना पैसे मिळवले जाणार असले तरी ज्या मैदानांचा वापर खेळण्यासाठी होत नसेल तर अशी मैदाने निरर्थकच नव्हेत का, असा सवाल  गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटीचे शेख फय्याज आलम यांनी केला आहे. परिणामी शिवाजीनगरमधील छत्रपती शाहू महाराज मनोरंजन मैदान लहान मुलांना खेळता यावे यासाठी उत्तम राखले पाहिजे, असेही शेख यांचे म्हणणे आहे. याबाबत महापालिकेसोबत पत्रव्यवहारही सतत केला जात असल्याचे  सांगण्यात आले.

कुर्ला - गांधी मैदान चांगले कधी होणार?
मुंबई : संयुक्त महाराष्ट्र आंदोलन असो किंवा महात्मा गांधींची सभा, प्रत्येक सभा आणि आंदोलनाचा साक्षी असलेले कुर्ला पश्चिम येथील गांधी मैदान पालिकेच्या ताब्यात असले तरी आजही मैदान सुस्थितीच्या प्रतीक्षेत आहे. येथील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे भुईसपाट केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने ऐतिहासिक गांधी मैदानाचा पालिकेस ताबा दिला आहे. मात्र,  तेथे परत बांधकामे होत असल्याने हा प्रश्न गंभीर बनला चालला होता. अखेर सर्वसंमतीने गांधी मैदानाच्या शासकीय जमिनीचा पालिकेने ताबा घेतला.  इतके होऊनही मैदानात वाहने उभी असतात. डेब्रिज आहे, कचरा आहे.

मुलुंड : टाटा कॉलनीच्या मैदानात होतात पार्ट्या ...
मुंबई : मुलुंड येथील टाटा कॉलनी येथील जागा मैदानासाठी आरक्षित असून हे म्हाडाच्या अखत्यारीत आहे. प्लॉटच्या संरक्षण भिंतीची पडझड झाली आहे. याला गेट नसल्याने या मैदानाचा वापर मद्यपी लोकांना पार्ट्या करण्यासाठी, अनधिकृत पार्किंगसाठी होतो. म्हाडा गेली कित्येक वर्षे स्वतः काही करत नाही. पालिकेला सोपवत नाही. मैदानाचा वापर तळीराम आणि अनधिकृत कामासाठी केला जातो, असे सामाजिक कार्यकर्ते रवी नाईक यांनी दिली.

Web Title: Mumbai: Grounds, parks in Mumbai in 'danger zone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.