मुंबई : कोरोना व्हायरसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच राज्यातील महाविकासआघाडीतील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला आयसोलेट करुन घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची कोरोना टेस्ट करुन घ्यावे, असे आवाहन अस्लम शेख यांनी केले आहे. तसेच, राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे, असेही अस्लम शेख यांनी म्हटले आहे.
कोरोना संकट काळात मुंबईतील अनेक भागांत अस्लम शेख यांनी पाहणी केली होती. दरम्यान, याआधी राज्यातील महाविकासआघाडीतील राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच, काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या तिन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, मुंबईत रविवारी दिवसभरात १ हजार ३८ कोरोनाचे रुग्ण आणि ६४ मृत्यू झाले आहेत. शहर-उपनगरात एकूण रुग्णसंख्या १ लाख १ हजार ३८८ इतकी असून मृतांचा आकडा ५ हजार ७१४ झाला आहे. सध्या २३ हजार ६९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहर-उपनगरात नोंद झालेल्या ६४ मृत्यूंमध्ये ५१ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ३९ रुग्ण पुरुष व २५ रुग्ण महिला होत्या.
मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४ जणांचे वय ४० वर्षांखालील होते. ३६ जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २४ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यान होते. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्के आहे. १३ जुलै ते १८ जुलैपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर १.२६ टक्के आहे. १८ जुलैपर्यंत मुंबईत ४ लाख ३३ हजार २२७ कोविडच्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर ५५ दिवस झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ७१ हजार १६५ रुग्ण कोविडमुक्त झाले.
बीआयटी चाळींत कोरोनाचे सावट
शहर-उपनगरात बीआयटी चाळी आणि त्या परिसरात ५११ कोरोना रुग्ण आढळले आहेत. माझगाव बीआयटी चाळींमध्ये १२७ रुग्ण आढळले आहेत. ई विभागातील माझगाव येथील १२ क्रमांकाच्या बीआयटी चाळीत तब्बल ७६ रुग्ण आढळले आहेत. त्यात १२ क्रमांकाच्या चाळीत ७६ रुग्ण आहेत. वाडीबंदर माझगाव बीआयटी परिसरात ८३ आणि कामाठीपुरा बीआयटीमध्ये ४९ रुग्ण आढळले आहेत. तर, भायखळा बीआयटी चाळी आणि परिसरात ६४ रुग्ण आढळले आहेत. मुंबई सेंट्रल, चिराबाजार, परळ बीआयटी या चाळीतील कोरोना रुग्णांची संख्या आठ दिवसांत वाढली आहे. मुंबई सेंट्रल बीआयटी संकुल आणि परिसरात ९ जुलै रोजी ४१ रुग्ण होते, तर १७ जुलै रोजी ४५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर परळ येथील बीआयटी चाळींत ४५ रुग्ण होते, तेथे आता ५४ रुग्णांची नोंद झाली.