मुंबई, गुजरात, उत्तर प्रदेश होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:01 AM2018-05-15T06:01:30+5:302018-05-15T06:01:30+5:30
मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेश दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची धक्कादायक माहिती, राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या संशयित दहशतवादी फैजल मिर्झाच्या (३२) चौकशीतून समोर आली आहे.
मुंबई : मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेश दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची धक्कादायक माहिती, राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या संशयित दहशतवादी फैजल मिर्झाच्या (३२) चौकशीतून समोर आली आहे. या तीन ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कटाच्या हालचाली सुरू होत्या. या प्रकरणी एटीएस मिर्झाची कसून चौकशी करीत आहेत.
मूळचा बंगळूरचा रहिवासी असलेला मिर्झा हा लहानपासून मुंबईतच वास्तव्यास आहे. त्याने शालेय शिक्षण अर्ध्यावरच सोडले. पुढे इलेक्ट्रिशियन म्हणून तो नोकरीला लागला. तो विवाहित असून, पत्नी, मुले आणि वडिलांसोबत राहतो. काही महिन्यांपूर्वीच चुलत भावामार्फत त्याला शारजापर्यंत पोहोचविणारा मुख्य म्होरक्या (हँडलर) फारुख डेवडीवालाच्या तो संपर्कात आला. डेवडीवाला हा अंडरवर्ल्डच्या संपर्कात आहे.
पुढे शारजामध्ये काही दिवस राहिल्यानंतर, त्याला दुबईमार्गे कराची येथे पाठविण्यात आले. कराचीतून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये त्याने दोन आठवड्यांचे प्रशिक्षण घेतले. तेथे त्याने अद्ययावत शस्त्रे चालविणे, बॉम्ब बनविणे, तसेच जाळपोळसहीत विविध प्रशिक्षण घेतले.
यामागे आयएसआय संघटना असल्याचा संशय एटीएसला आहे. पर्यटन व्हिसाद्वारे मिर्झा मुंबईत आला. तो मुंबईत आल्याची माहिती मिळताच एटीएसने ३७ ठिकाणी त्याचा शोध घेतला. त्यानंतर, जोगेश्वरीतून तो एटीएसच्या जाळ्यात अडकला.
मुंबईत तो सुसाइड बॉम्बर म्हणून काम करणार असल्याचेही त्याच्या चौकशीत उघड झाले आहे. मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेश ही तीन ठिकाणे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती. या ठिकाणच्या पार पडत असलेल्या आणि पुढे येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा मनसुबा मिर्झाच्या अटकेमुळे एटीएसने उधळून लावला. मात्र, म्होरक्या भेटत नाही, तोपर्यंत मुख्य धोका टळला नसल्याची भीतीही एटीएसकडून वर्तविण्यात येत आहे. त्याच्या चौकशीतून अनेकांची नावे समोर आली आहेत. यापैकी दोघे अंडरग्राउंड झाल्याने एटीएसच्या अडचणी वाढल्या आहेत.
यात आणखी किती भारतीय, तसेच पाकिस्तानी तरुणांचा समावेश आहे, या दिशेने अधिक तपास सुरू असल्याची माहिती एटीएसने दिली.
>सात जणांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणात मिर्झासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये १ मौलासह २ प्रशिक्षक, २ मदतनिसांसह १ हँडलरचा समावेश आहे.
मिर्झा पहिल्यांदाच गेला पाकिस्तानला
मिर्झा हा पहिल्यांदाज पाकिस्तानला गेल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर येत आहे. मात्र, याची खातरजमा एटीएसकडून सुरू आहे. त्याच्या प्रवासाचा, राहण्याचा खर्च फारुख देवडीवाल्यानेच केला होता, तसेच काम पूर्ण केल्यानंतर त्याच्या मोबदल्यात त्याच्या कुटुंबाला पैसे मिळणार होते. यात त्याच्या कुटुंबाचा सहभाग होता की नाही, याचा अधिक तपास सुरू आहे.
दिल्ली कनेक्शन
दिल्ली पोलिसांनी मार्च अखेरीस काही संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. मिर्झा त्यांच्या संपर्कात असल्याच्या संशयातून तपास सुरू आहे, तसेच आतापर्यंत अटक केलेल्या बांगलादेशींकडेही चौकशी सुरू आहे.
>नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंवर निशाणा?
पंतप्रधान नरेंद्र्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच माहितीच्या आधारे गेल्या महिन्यात उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती का, यामागील तथ्य पडताळण्यात येत असल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले.