Join us

मुंबई गुवाहाटी विमान पोहोचले ढाक्याला; नऊ तास प्रवासी विमानातच बसून

By मनोज गडनीस | Published: January 13, 2024 4:45 PM

मात्र, प्रवाशांकडे पासपोर्ट नसल्यामुळे कुणालाही विमानातून खाली उतरता आले नाही. तब्बल ९ तास प्रवासी विमानातच बसून होते.

मुंबई - मुंबईतून गुवाहाटीसाठी निघालेले इंडिगोचे विमान गुवाहाटी परिसरात असलेल्या दाट धुक्यामुळे गुवाहाटी येथे उतरू न शकल्याने ते विमान बांग्लादेशची राजधानी असलेल्या ढाका येथे उतरविण्यात आले. मात्र, परदेशात विमान लँड झाल्यामुळे प्रवाशांना विमानातून खाली उतरला न आल्याने प्रवाशांचा अनेक तासांचा खोळंबा झाल्याची माहिती आहे.

इंडिगो कंपनीचे ६ ई ५३१९ या विमानाने मुंबईहून गुवाहाटीसाठी उड्डाण केले. मात्र, दाट धुक्यामुळे कमी दृष्यमानता होती त्यामुळे विमान गुवाहाटी विमानतळावर उतरवणे वैमानिकाला अशक्य झाले. त्यामुळे त्याने जवळच्या ढाका विमानतळाशी संपर्क साधत लँडिंगची परवानगी मागितली. ही परवानगी मिळाल्यानंतर ते विमान तिथे उतरले. मात्र, प्रवाशांकडे पासपोर्ट नसल्यामुळे कुणालाही विमानातून खाली उतरता आले नाही. तब्बल ९ तास प्रवासी विमानातच बसून होते. त्यानंतर इंडिगोने पर्यायी कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आणि शुक्रवारी उशीरा हे विमान ढाक्यावरून गुवाहाटीसाठी रवाना झाले.