मुंबईसह राज्यात गारठा कायम, हुडहुडी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 06:26 AM2019-01-09T06:26:48+5:302019-01-09T06:27:11+5:30
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे.
मुंबई : शीत वारे आणि कमी दाबाचे क्षेत्र या वातावरणातील प्रमुख बदलामुळे उत्तर भारतात बुधवारी कमालीचे धुके नोंदविण्यात येईल. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील गारठा कायम असून, मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १६.३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ६.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. ९ जानेवारी रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, १६ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.
खान्देशात वृद्धेचा बळी
जळगाव जिल्ह्यातील तळेगाव येथील केशरबाई साळवे (९५) या वृद्धेचा मंगळवारी सकाळी कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला. सकाळी नाश्ता करीत असताना त्यांना अचानक थंडीचा त्रास होऊ लागला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.