Join us

मुंबईत गारठा कायम

By admin | Published: December 25, 2015 3:22 AM

देशाच्या पूर्वेसह उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कायम राहिल्याने गुरुवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ६.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले

मुंबई : देशाच्या पूर्वेसह उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कायम राहिल्याने गुरुवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ६.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले, तर मुंबईचे किमान तापमान ११.४ अंश नोंदविण्यात आले असून, बुधवारी मुंबईचे किमान तापमान ११.६ अंश नोंदविण्यात आले होते. किमान तापमानातील घसरणीमुळे मुंबईतला गारठा वाढतच असून, गुरुवारच्या गारठ्यानंतर हवामान विभागाने २४ डिसेंबर हा उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी ‘शीत दिवस’ म्हणून घोषित केला आहे. कोकणाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात तर कोकणाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)> थंडीने मुंबईकरांना भरली हुडहुडी बुधवारी मुंबईचे किमान तापमान महाबळेश्वरपेक्षा कमी नोंदविण्यात आले होते. गुरुवारीही परिस्थिती तशीच राहिली आहे. महाबळेश्वरचे किमान तापमान १४.४ तर मुंबईचे ११.४ अंश नोंदविण्यात आले.थंडीने मुंबईकरांना हुडहुडी भरली असली, तरी मुंबईकर या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. सकाळी आणि रात्रीच्या गारव्यात फेरफटक्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांनी ऊबदार कपडे वापरायला बाहेर काढले आहेत.मुंबईतील कुलाबा वेधशाळेत कमाल व किमान तापमान अनुक्रमे २७.३, १७.२ अंश तर सांताक्रुझ वेधशाळेत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८.३, ११.४ अंश नोंदविण्यात आले आहे. पुढील चोवीस तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.नाशिक ६.४ जळगाव ८.४ नांदेड ९.५ मालेगाव ९.८ पुणे १०.२ अकोला ११ औरंगाबाद ११ गोंदिया १२.३ यवतमाळ १२.४ परभणी १२.७ अमरावती १३ बुलढाणा १३ नागपूर१३.४सांगली१५.७