मुंबई : शहरात कमाल आणि किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असून, शुक्रवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९, १७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गार वाऱ्याचा जोर वाढल्याने शहराचे तापमान घसरले आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. कोकणाच्या काही भागांत किमान तापमानात किंचित घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे.१६ आणि १७ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. १८ जानेवारी रोजी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. १९ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. पुढील ४८ तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या प्रदेशातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९, १७ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या ४८ तासांपुरता तरी मुंबईतला गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
मुंबईत गारठा वाढला
By admin | Published: January 16, 2016 2:05 AM