मुंबईत निम्म्या ज्येष्ठ नागरिकांनी घेतले दोन्ही डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:06 AM2021-07-21T04:06:44+5:302021-07-21T04:06:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील सहा महिने मुंबईत लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ६५ लाख ३७ हजार ३२४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील सहा महिने मुंबईत लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ६५ लाख ३७ हजार ३२४ नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी ६० वर्षांवरील १५ लाख ४० हजार ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली असून, दोन्ही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ५० टक्के आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने निम्म्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे दिलासादायी ठरले आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. अतिजोखमीच्या गटात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी १ मार्चपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणात मुंबईत ११ लाख ज्येष्ठ नागरिक असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार आतापर्यंत ८८ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
मुंबईत कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी ९० लाख नागरिक लाभार्थी आहेत. नागरिकांना दोन्ही डोस देण्यासाठी मुंबईला एक कोटी ८० लाख लसींची गरज आहे. मात्र आतापर्यंत ६५ लाख लसी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार ५५ टक्के नागरिकांनी आतापर्यंत पहिला डोस घेतला आहे. यापैकी सुमारे दहा लाख ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर साडेपाच लाख जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
* कोविड प्रतिबंधक लस घेणारे - ९० लाख
* १८ ते ४५ वयोगट ४५ लाख
* ४५ वर्षांवरील नागरिक ३५ लाख
* यापैकी ६० वर्षांवरील ११ लाख नागरिकांचा समावेश आहे.
* संपूर्ण मुंबईकरांच्या लसीकरणासाठी एक कोटी ८० लाख डोसची गरज आहे.
यांनी घेतली लस
६० वर्षांवरील -
पहिला डोस... ९.७७ लाख
दुसरा डोस....५.५८ लाख
४५ ते ५९ वयोगट
पहिला डोस... १३.८२ लाख
दुसरा डोस.... ५.७८ लाख
१८ ते ४४ वयोगट
पहिला डोस... २२.३४ लाख
दुसरा डोस.... ७०,०५५