Join us

मुंबईत ५७० कंटेनमेंट झोन्स तर सील इमारती ५ हजार ३६१

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 4:48 PM

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचा दावा

कुर्ल्यात सर्वाधिक म्हणजे ६१ कंटेनमेंट झोन्स, कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार २५८

बोरीवलीत सर्वाधिक म्हणजे ५२२ इमारती सील, कोरोनाबाधितांचा आकडा ६३५

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असला तरी आजघडीला मुंबईतील कंटेनमेंट झोन्सचा आकडा ५७० एवढा असून, सील करण्यात आलेल्या इमारती ५ हजार ३६१ आहेत.

कंटेनमेंट झोन्सचा विचार करता ५७० मध्ये ९ लाख ५२ हजार ४८० घरांचा समावेश आहे. तर या कंटेनमेंट झोन्समधील लोकसंख्या ४० लाख ६३ हजार ४५ एवढी आहे. आणि यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा ३१ हजार ३२८ एवढा आहे. मुंबईत सर्वाधिक  कंटेनमेंट झोन्स हे एल विभागात असून, येथील कंटेनमेंट झोन्सचा आकडा ६१ असून, कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ हजार २५८ आहे.

सील करण्यात आलेल्या इमारतींचा विचा करता मुंबईत ५ हजार ३६१ इमारती सील करण्यात आल्या आहेत. सर्वाधिक इमारती आर-सी विभागात बोरीवली येथे सील करण्यात आल्या असून, हा आकडा ५२२ आहेत. तर येथील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ६३५ आहे. ५ हजार ३६१ इमारतींमध्ये २ लाख ५ हजार २८० घरे असून, लोकसंख्या ७ लाख ५० हजार ४६१ आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २२ हजार १७२ आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्र नेमके कोणते असेल हे महापालिका/जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत ठरविण्यात येते. महानगरपालिका क्षेत्रात पालिका आयुक्त, तर जिल्ह्यातील इतर भागासाठी जिल्हाधिकारी यांना प्रतिबंधित क्षेत्र नेमके कोणते असेल हे ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित क्षेत्राची तपासणी वेळोवेळी करणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रात रहिवासी संकुल आणि वस्ती, झोपडी, इमारत, रस्ता, वॉर्ड, पोलीस ठाणे परिसर, छोटे गाव असू शकतील. पूर्ण तालुका, पूर्ण पालिका क्षेत्र  प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यापूर्वी मुख्य सचिव यांची परवानगी घेणे आवश्यक असते.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका