Join us

विहीर, तलाव आहे... पण पाणी वापरता येत नाही; अजूनही मुंबईकरांवर टंचाईची तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 1:19 PM

शुद्ध पाणी वाचवा, विहिरी लुप्त होऊनही पालिकेकडे नोंदच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत आजही म्हणावा तसा जलसाठा निर्माण झालेला नाही. परिणामी मुंबई गॅसवर असून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही तर मुंबईकरांना वर्षभर पाणी जपून वापरावे लागणार आहे. मात्र, यावर उपाय म्हणून मुंबईकरांनी विहिरीसह तलावांचे पाणी वापरण्यावर भर द्यावा, असे म्हणणे जलतज्ज्ञांनी मांडले असले तरी प्रत्यक्षात मात्र तलावांतील पाणी दूषित असण्यासह बहुतांश विहिरी बुजविल्या गेल्याने त्या पाण्याचाही मुंबईकरांना वापर करता येत नसल्याचे चित्र आहे.

शुद्ध पाणी वाचवा

मुंबईत सरासरी २००० मिमी पाऊस पडतो. मुंबईचे ४५८.५३ किमी क्षेत्रफळ लक्षात घेता पावसापासून जवळपास २,३९४ दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्यापैकी २० टक्के पाणी बचत करून वापरले तरी दररोज ४७९ दशलक्ष लिटर इतके पालिकेचे शुद्ध पाणी वाचविता येईल. ३,८५० दशलक्ष लिटरचे ३० टक्के म्हणजे जरी तांत्रिक खराबा १५ टक्के धरला तरी जवळपास ५०० दशलक्ष लिटर पाणी म्हणजे एका धरणातून मिळते.

विहिरी लुप्त होऊनही पालिकेकडे नोंदच नाही

  • अतिक्रमणामुळे विहिरी लुप्त झाल्या असून, याची पालिकेकडे नोंद नाही.
  • मुंबईत भूजलाची नोंद होत नाही. भूजल स्रोत गाडले गेले आहेत.
  • बांधकामासाठी विहिरी बुजविण्यात आल्या आहेत.
  • मुंबईत सुमारे १९ हजारांपेक्षा जास्त पाण्याच्या विहिरी आहेत; ज्यापैकी १२ हजार ५०० बोअरवेल आहेत.
  • भूजलाचा वापर थांबला असला तरी टँकर माफियांकडून भूजलाचा उपसा होत असून बांधकामासाठी पाण्याचा वापर केला जातो.
  • स्वच्छ पाणी नागरिकांचा अधिकार आहे.
  • सुमारे १५ ते २० लाख लोकांना कायदेशीर पाणी मिळत नाही.
  • झोपडपट्टी आणि सोसायट्यांमध्ये पाणी देताना दुजाभाव होतो. 
  • मुंबईला ९७ टक्के पाणी मुंबई बाहेरून आणावे लागते.
  • स्वतःच्या भौगोलिक हद्दीत केवळ ३% पाण्याचे स्रोत आहेत.
  • शहरातील पाण्याचे स्रोत उद्ध्वस्त झाले आहेत.
  • विहीर, तलाव, नाले, ओहोळ आणि नद्या नष्ट केल्या आहेत.
टॅग्स :मुंबईपाणी टंचाई