मुंबई : एकीकडे क्रॉक्रिटीकरण, औद्योगिकीकरण, ग्रीन हाउस इफेक्ट, प्रदूषण, विकासकामे आणि बांधकामे वाढत असतानाच दुसरीकडे झाडांची संख्या घटत आहे. परिणामी समुद्राचे तापमान वाढल्याने मुंबई हीट आयलँड बनली आहे. वाढत्या तापमानाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रदूषण कमी करण्यासह वृक्ष लागवडीवर जोर देण्याची गरज आहे, असे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत गेल्या २५ वर्षांत काँक्रिटचे जंगल ४० टक्क्यांनी वाढले. झाडांची कत्तल, वाढती बांधकामे, तिवरांची हानी हे सगळे घटक यास कारणीभूत आहेत. शिवाय ग्रीन हाउस इफेक्ट वाढत असून, वायू प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. वाहने आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारे वायू शहरावर एक स्तर तयार करत आहेत. सूर्याची किरणे जमिनीवर पडल्यानंतर वाढणारे तापमान हे स्तर पसरू देत नाहीत. त्यामुळे वाढीव तापमान कायम राहत असल्याने तापमानवाढीचा कहर कायम आहे.
तापमान ३७ अंश सेल्सिअस
मुंबईचे तापमान समुद्रामुळे ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदविले जाऊ नये. कारण समुद्र तापमान स्थिर राखत असतो. तरीही मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदविले जात असल्याकडे पर्यावरण अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे.
... यामुळे ढगफुटीच्या घटना
साध्या जमिनीवर किंवा जंगलात सूर्य मावळला की दोन तासांत हीट बाहेर पडते. शहरात मात्र काँक्रिटीकरणामुळे हीट बाहेर पडत नाही. यामुळे दिवसा तीन आणि रात्री एकने तापमान वाढते. अशाने पावसाळ्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. परिणामी समुद्रातील बाष्प शहराकडे आल्याने ढगफुटीसारख्या घटना घडतात.
बांधकामांना गडद रंग नको
हीट आयलँड इफेक्ट कमी करण्यासाठी बांधकामांना गडद रंग मारू नये. सफेद रंग मारावा. जेणेकरून सूर्याची किरणे परावर्तित होतील. शिवाय काँक्रिट किरणांना शोषून घेणार नाही. प्रदूषण कमी करत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावावीत. छोट्या उद्यानांची निर्मिती करावी हे उपाय आहेत.
३ अंशांनी वाढ
नैसर्गिक वातावरणामुळे तापमान स्थिर राहण्यास मदत होते. मात्र, जमिनीचा वापर बदलला म्हणजे जिथे तलाव, पाणी, झाडे असतील, अशा जमिनीचा वापर वाढला तर त्या परिसरातील तापमान सरासरीच्या तुलनेत तीन अंशांनी वाढ होते. परिणामी हीट आयलँड इफेक्ट होतो. काँक्रीट हे हीट रोखून धरते. दिवसभर उष्णता शोषून घेते आणि सोडून देत असते. रात्रीही काँक्रिटमधून हीट बाहेर पडत असते.
२०१५ मध्ये समुद्राचे सरासरी तापमान ०.४ अंश सेल्सिअस होते. २०२४ मध्ये ते ०.६ अंश झाले. समुद्राचे तापमान वाढले की उष्णता निर्माण होते - प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लानेट सोसायटी