मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात वाढत असलेल्या काँक्रिटीकरणाचा फटका आता नागरिकांना वाईटरित्या बसू लागला असून, वाढते प्रदूषण आणि हरितगृह वायूंच्या परिणामामुळे गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे.
सोबतच मुंबईमध्ये कमी वेळात पडणाऱ्या अधिक पावसाची नोंद गेल्या काही वर्षांपासून वाढल्याने हा सगळा परिणाम वातावरणातील बदलामुळे होत असल्याचे मत पर्यावरण अभ्यासकांनी नोंदविले आहे आणि मुंबई आता एक हिट आयलँड झाल्याचा निष्कर्ष देखील मांडला आहे. यावर उपाय म्हणून शहरी वनीकरणावर भर देतानाच वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत मांडले आहे.
प्रस्ताव आणि उपाययोजनाअमेरिकेमधील बहुतांशी शहरांना या रीतीने फटका बसला असून, भारतातील समुद्राकाठची शहरे देखील आता हिट आयलँडला सामोरे जात आहेत. यावर उपाय म्हणून पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी मंत्रालयासंदर्भात एक प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाला अनुसरून शहरी वनीकरण व बाकीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
काय आहेत उपाय? मुंबई हीट आयलँड बनल्याने वायूप्रदूषणाचा प्रश्न सोडविणे हा प्रमुख उपाय असल्याचेच समोर आले आहे. रस्त्यासभोवताली आणि इमारती लगत अधिकाधिक झाडे लावणे हा उपाय सर्वात महत्त्वाचा आहे. मुंबई शहर आणि उपनगरात बहुतांशी भागावर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे तापत असलेले रस्ते थंड होण्यास बराच वेळ लागत आहे. समुद्रालगत जी शहरे वसलेली आहेत अशा सगळ्या शहरांना भविष्यात याचा मोठा फटका बसणार आहे. उष्णता साठवून ठेवणाऱ्या वस्तूंमुळे संबंधित शहरातील तापमान सभोवतालच्या तापमानापेक्षा २ ते ३ अंश अधिक नोंदविले जाते. तापमानातील हा बदल वर्षभर जाणवतो. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तिन्ही ऋतूमध्ये हे तापमान नोंदवले जाते.