अबब: मुंबईचे झाले हिटर, लाेक शाेधू लागले कुलर; संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 06:47 AM2022-03-15T06:47:31+5:302022-03-15T06:47:49+5:30
मुंबई ३९.६, रत्नागिरी ४०.२ अंश, संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह लगतच्या परिसरात आलेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांना चांगलेच चटके दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३९.६ अंश एवढे नोंद झाले असून, यंदाच्या मोसमातील आतापर्यंतचे हे उच्चांक कमाल तापमान आहे. शिवाय, पुढील काही दिवस संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही केले आहे.
संपूर्ण गुजरात राज्य व महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यासहित नाशिक, ठाणे मुंबई शहर, क्षेत्र तसेच संपूर्ण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ३ दिवस म्हणजे १७ मार्चपर्यंत ३८ ते ४० अंशांपर्यंत तापामानात वाढ होईल. तर, १८ मार्चपासून पुन्हा तापमान कमी होऊन पारा २ ते ३ अंशांनी खाली येऊ शकतो. पुढील ८ दिवस म्हणजे सोमवार २१ मार्चपर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पाऊस किंवा गारपीटीची शक्यता नाही, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
१५ मार्चला मुंबई, ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. १६ मार्च रोजी संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. - कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामान शास्त्र विभाग