मुंबईला खड्ड्यात टाकलं अन् आता कचऱ्यावर शुल्क, आम्ही कडाडून विरोध करू; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:38 IST2025-04-01T16:36:16+5:302025-04-01T16:38:22+5:30
मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच घनकचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे. हे कशासाठी होतंय, कोणासाठी होतंय, याला कारणीभूत कोण? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

मुंबईला खड्ड्यात टाकलं अन् आता कचऱ्यावर शुल्क, आम्ही कडाडून विरोध करू; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Shiv Sena Aditya Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिकेतील कारभारावरून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील नागरिकांवर घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली कर आकारला जाणार असून या कराचा सर्व मुंबईकरांनी कडाडून विरोध केला पाहिजे, असं आवाहन आदित्य यांनी केलं आहे.
"मुंबई महानगरपालिकेवर जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आपण ५०० स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांचा प्रॉपर्टी टॅक्स माफ केला होता. पण हे देवेंद्र फडणवीस यांचं एप्रिल फूल सरकार, ५०० स्क्वेअर फुटाच्या घरावरही घनकचरा व्यवस्थापनाचे प्रतिमहिना १०० रुपयांचं शुल्क लावणार आहे. हळूहळू हे शुल्क वाढत जाईल. मागील अडीच वर्षांत एसंशि सरकारने मुंबईची लूट केली, मुंबईकरांच्या घामाचे पैसे यांनी यांच्या लाडक्या कंत्राटदारांच्या खिशात टाकले आहेत, त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांकडून शुल्क आकारले जात आहे. ३१ मेपर्यंत या शुल्काबाबत सजेशन-ऑब्जेशनसाठी वेळ देण्यात आला आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सर्व मुंबईकरांना विनंती करत आहे की, या शुल्काचा आपण कडाडून विरोध केला पाहिजे. कारण हा अदानी कर आहे. एसंशि यांच्या आणि भाजपच्या मालकांची सेवा करण्यासाठी आपल्यावर हा कर लादण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक मुंबईकराने आणि मुंबईप्रेमी जनतेने मुंबई महानगरपालिकेला लेखी सूचना पाठवून आम्ही या कराचा विरोध करत आहोत आणि आम्ही एक रुपयाही भरणार नाही, हे सांगितलं पाहिजे," असं आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना उद्देशून म्हटलं आहे.
"मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच असे शुल्क लादले"
आदित्य ठाकरे म्हणाले की, "मी दोन-तीन महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की, मुंबईवर अदानी टॅक्स लावला जाणार आहे. आता मुंबई महानगरपालिकेने काल प्रेस नोट काढली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, घनकचरा म्हणजे प्रत्येक घरातून, दुकानांतून जो कचरा बाहेर दिला जातो त्यावर टॅक्स लावला जाणार आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांना दंड लावलाच पाहिजे, तो दंड वाढवला तर त्याविषयी आमचं काहीही म्हणणं नाही. हा दंड वसूल केला जावा. मात्र मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच घनकचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे. हे कशासाठी होतंय, कोणासाठी होतंय, याला कारणीभूत कोण? या सगळ्याचा आपण खोलात जाऊन विचार केला पाहिजे."
"मुंबईला खड्ड्यात टाकलं"
मुंबईतील रस्त्याच्या स्थितीवरून आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "एसंशि सरकार असताना आम्ही दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करू, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. पण आता संपूर्ण शहरात धूळ आहे, खड्डे आहेत. मुंबई शहर यांनी खड्ड्यात टाकलं आहे. त्यामुळे आमदार त्रस्त आहेत, शहरातील नागरिक त्रस्त आहेत," असं ते म्हणाले.
"...हे तर एप्रिल फूल सरकार"
"आज १ एप्रिल आहे. जगभरात हा दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा होतो आणि आपल्या देशात अच्छे दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने जे सरकार स्थापन झालं आहे त्या सरकारला एप्रिल फूल सरकार असंच नाव द्यावं लागेल. कारण १०० दिवसांत या सरकारने एकही चांगलं काम केलेलं नाही. अनेक जुन्या योजना बंद केल्या जात आहेत. लाडकी बहीण योजनेत अडीच हजार रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण ती रक्कम अजूनही दीड हजार रुपयेच आहे आणि ही योजनाही बंद होण्याच्या मार्गावर आहे. लाडका भाऊ योजना बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असं मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस निवडणुकीआधी सांगत होते आणि आता त्यांच्याच सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणतात शेतकरी कर्जमाफी होणार नाही. असं करणारं हे पहिलंच सरकार असेल," अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेतून केली आहे.