मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:12 AM2018-06-26T06:12:59+5:302018-06-26T06:13:17+5:30

२६ जून रोजी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mumbai has been warned of heavy rain | मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा कायम

मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा कायम

googlenewsNext

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला सोमवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच, पुढील चार दिवस म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सूनची वाटचाल ओरिसाच्या आणखी काही भागांत झाली आहे. पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात, बिहार आणि झारखंडच्या काही भागांतही मान्सून दाखल झाला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उत्तर कोकणात मुंबई शहर, उपनगराचा समावेश होतो.

२६ जून रोजी गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ जून रोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. २८ जून रोजी कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २९ जून रोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


म्हणे पाणी तुंबलेच नाही... - महापौरांचा अजब दावा
मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जलमय परिस्थिती निर्माण झाली. सखल भागात पाणी साचलेल्याने काही ठिकाणी मुंबई पाण्याखाली गेली. रेल्वे मार्गासह रस्ते मार्गावरील सखल भागात पाणी साचले. रेल्वे आणि रस्ते मार्गाची गती कमी झाली आणि मुंबईकरांची तारांबळी उडाली. एवढे सर्व घडल्यानंतरही मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून महापौरपदी विराजमान असलेले विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत पाणी तुंबले नसल्याचा दावा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत मुंबईत धोधो पावसाची नोंद झाली. जनजीवन विस्कळीत झाले. मुंबई जलमय झाल्याचे चित्र होते. मात्र तरीही मुंबईत पाणी तुंबले नसल्याचा दावा महापौरांनी केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.  कोठेही पाणी तुंबले नसल्याचा दावा करतानाच पालिकेने चांगले काम केल्याचे महापौरांनी म्हटले आहे. वडाळ्यातील दुर्घटनेविषयी ते म्हणाले; येथे मनुष्यहानी झाली नाही हे सुदैव आहे. पालिका अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली आहे. दरम्यान, मुंबई पावसासाठी सज्ज असल्याचा दावा महापौरांनी यापूर्वी केला होता. मात्र पावसात त्यांचे दावे वाहून गेले आहेत. तरीदेखील पावसात सर्व सुरळीत होते, असे म्हणत महापौरांकडून बचाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यंदा कमी पाणी तुंबले - उद्धव ठाकरे
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणी तुंबल्याचे म्हटले असहे. भूभाग समुद्रसपाटीपासून खाली असल्याने काही वेळा पाणी साचते, असेही ते म्हणाले. पालिका मुख्यालयातील आपत्कालीन विभागासोबत सोमवारी त्यांनी चर्चा केली, तेव्हा ते बोलत होते. थोडा जरी मुसळधार पाऊस पडला, तरी मुंबईचा चक्का जाम होतो. सखल भागात पाणी साचते. लोकल, रस्ते वाहतूक विस्कळीत होते. पालिकेच्या कामाावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. राजकीय पक्षांकडून प्रशासनावर कठोर टीका होते. विशेषत: भाजपासह उर्वरित राजकीय पक्षांकडून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले जाते, असे ते म्हणाले.

कंत्राटदाराला ५ लाखांचा दंड
खार पश्चिम परिसरातील चमडावाडी नाल्यावरील पाणी उपसा करणारे ४ पंप डिझेलअभावी बंद असल्याने, कंत्राटदार महाबुल इंफ्रा इंजिनीअरिंगला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावत काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये? याबाबत २४ तासांची नोटीस सोमवारी पर्जन्यजल विभागाने बजावली. संबंधित कंत्राटदाराने या ४ पंपांसाठी २०० लीटरचा अतिरिक्त साठा ठेवणे बंधनकारक होते. तसे त्यांना लेखी/तोंडी बजावले होते. तरीही गरज असताना रविवार, सोमवारी डिझेलअभावी पंप सुरू होऊ शकले नाहीत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Mumbai has been warned of heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.