मुंबई ३५ अंशांवर, उकाडा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 06:10 AM2018-04-10T06:10:55+5:302018-04-10T06:10:55+5:30
वाढत्या कमाल तापमानासह प्रचंड उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत. मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशांवर गेले असून उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत.
मुंबई : वाढत्या कमाल तापमानासह प्रचंड उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत. मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशांवर गेले असून उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत. दुसरीकडे हवामानात नोंदविण्यात येत असलेल्या बदलामुळे राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. विशेषत: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. मागील दोन दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पावसाची नोंद होत असतानाच येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किंचित घट झाली आहे.
विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले असल्याचे हवामान शास्त्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
१० आणि ११ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. १२ एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. १३ एप्रिल रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
पावसाने परतीचा मार्ग धरला, तशी छत्री कपाटात गूपचूप जाऊन विसावली. पुढच्या पावसापर्यंत आपली आठवण कुणालाच येणार नाही, या विचाराने जणू हिरमुसली. मात्र, यंदा उन्हाचा कडाका भलताच वाढला. त्यामुळे या उन्हापासून बचाव करण्यासाठी मुंबईकरांनी छत्रीचा आसरा घेतला आणि कपाटात बंद होऊन पडलेली छत्री पुन्हा उघडली गेली. त्यामुळे मुंबईत दुपारच्या वेळेस सर्वत्र छत्रीचेच साम्राज्य दिसत आहे.
>उकाडा तापदायक
मुंबईचा विचार करता मंगळवारसह बुधवारी मुंबईमधील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २२ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुळात मागील तीनएक दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांच्या घरात नोंदविण्यात येत आहे.
दिवसा कडाक्याच्या उन्हाने मुंबईकर हैराण होत असतानाच रात्रीच्या उकाड्यात भर पडत असल्याने दुहेरी वातावरणाने मुंबईकरांची दमछाक होत आहे. विशेषत: अवकाळी पावसाने राज्य गारद होत असतानाच मुंबईकरांसाठी कडक्याचे उन आणि उकाडा तापदायक ठरत आहे.