देशात मुंबईतील गाड्यांची घनता सर्वात जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 11:51 PM2019-11-20T23:51:40+5:302019-11-20T23:51:54+5:30
मुंबईत वाहनांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त
मुंबई : मुंबईत वाहनांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईत प्रति किमी ५३० कार आहेत. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत होते.
गेल्या तीन वर्षांत मुंबईतील कारची घनता २३ टक्क्यांनी वाढली आहे. मार्च महिन्यात मुंबईतील कारची घनता ही प्रति किमी ५१० होती. ही घनता इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे. यामध्ये पुणे ३५९, कोलकाता ३१९, चेन्नई २९७, बंगळुरू १४९ अशी कारची घनता आहे. दिल्लीची (१०८) मुंबईशी तुलना केल्यास मुंबईतील कारची घनता ही दिल्लीच्या पाचपट आहे. तर मुंबईत एकूण ३२.५ लाख कार असून दिल्लीत १०.६ लाख कार आहेत.
मुंबईतील कारचे प्रमाण दिल्लीच्या तीनपट आहे. मुंबईत कारची घनता कमी असण्याचे कारण म्हणजे रस्त्याची जागा कमी असणे. मुंबईत २,००० किमी रस्ते आहेत तर दिल्लीत २८,९९९ किमी रस्ते आहेत. आरटीओच्या माहितीनुसार, गेल्या आठ वर्षांत वाहनांची संख्या ८२ टक्क्यांनी वाढली आहे. त्यासोबतच कारची संख्या ७० टक्के आणि दुचाकींची संख्या ९५ टक्क्यांनी वाढली आहे. आठ वर्षांत दुचाकींची संख्या दुपटीने वाढली आहे. कारने मुंबईत रस्त्यांची अर्धी जागा व्यापली आहे. त्यानंतर दुचाकींनी रस्त्यांची २८ टक्के जागा आणि केवळ १३ टक्के जागा बस आणि ट्रकने व्यापली आहे.
ज्या ठिकाणी जायला १५ मिनिटे लागतात त्या ठिकाणी जाण्यास वाहतूककोंडीमुळे ३५ मिनिटे लागतात, असे वाहनचालकांनी सांगितले. यामध्ये महालक्ष्मी रेसकोर्सजवळचा केशवराव खाडे मार्ग, वरळीचा ई मोसेस मार्ग, जेकब सर्कल ते मुंबई सेंट्रलपर्यंत डॉ. आनंदराव नायर मार्ग, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप येथे एलबीएस मार्ग या भागांचा समावेश आहे.