मुंबई : निर्बंध शिथिल केल्याने सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते आहे. अशा स्थितीत कोरोना चाचण्यांना गती देण्याची आवश्यकता असताना दर दहा लाखांमागे राज्याच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक चाचण्या होत असल्याची माहिती पालिकेच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
मुंबईत दर दहा लाखांमागे ६ लाख १८ हजार १९ व्यक्तींच्या चाचण्या केल्या जात आहेत. राज्यात हे प्रमाण ४ लाख ४२ हजार ६०६ आहे. मुंबईत सध्या २ हजार ९०० रुग्ण सक्रिय आहेत, तर राज्यात ६३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ८२ हजार ७६ कोरोना रुग्ण आढळले असून मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३९ हजार ६९ इतकी आहे.
देशातील अन्य नऊ शहरांच्या तुलनेत दर दहा लाखांमागे सर्वाधिक चाचण्या करण्यात बंगळुरू आघाडीवर आहे. बंगळुरूमध्ये दर दहा लाखांमागे ९ लाख ९४ हजार १६८ व्यक्तींच्या चाचण्या केल्या जातात. बंगळुरूमध्ये आतापर्यंत एकूण १ कोटी २२ लाख ५५ हजार ११० चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल मुंबईचा क्रमांक लागत आहे. तर सातव्या क्रमांकावर राज्याचे स्थान आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत दर दहा लाखांमागे सर्वांत कमी चाचण्या करण्यात पश्चिम बंगाल आणि राजस्थानचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये १ लाख ८० हजार ९९७ चाचण्या, तर राजस्थानमध्ये १ लाख ९३ हजार २५४ कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या डॅशबोर्डवरून प्राप्त झाली आहे.