मुंबईत महिला घर खरेदीदारांचे प्रमाण कमी; मुद्रांक शुल्कात सवलत देऊनही घट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:10 AM2021-09-05T04:10:03+5:302021-09-05T04:10:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घर खरेदीदारांमध्ये महिलांचे प्रमाण वाढावे व जास्तीत जास्त घरांची मालकी महिलांकडे जावी यासाठी राज्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घर खरेदीदारांमध्ये महिलांचे प्रमाण वाढावे व जास्तीत जास्त घरांची मालकी महिलांकडे जावी यासाठी राज्य सरकारने १ एप्रिल २०२१ पासून महिलांना मुद्रांक शुल्कात १ टक्क्याने सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र, मुद्रांक शुल्कात सवलत देऊनही मुंबईत एकूण घर खरेदीच्या बाबतीत महिला घर खरेदीदारांचा वाटा कमी असल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत ६ हजार ७८४ घरांची खरेदी झाली. मात्र, यामध्ये केवळ २७१ महिलांनी आपल्या नावावर घर खरेदी केले आहे. त्यामुळे या सवलतीचा फायदा घेण्यासाठी महिला पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे.
सरकारने १ एप्रिलपासून ही सवलतीची योजना सुरू केल्यानंतर याचा फायदा घेण्यासाठी अनेक कुटुंबातील पुरुष घर खरेदी आपली आई, मुलगी, बहीण किंवा पत्नीच्या नावे करण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली होती, तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम स्त्रिया या सवलतीचा फायदा घेतील अशीही आशा होती. ६२ टक्के स्त्रिया या बँक, शेअर बाजार व सोने यातील गुंतवणुकीपेक्षा घर खरेदी करण्याला अधिक पसंती दर्शवीत असल्याचे एका सर्वेक्षणातून निष्पन्न झाले होते. मात्र, तरीही महिला खरेदीदारांमध्ये वाढ झाली नाही. सरकारने मुद्रांक शुल्कात १ टक्क्यांनी दिलेली सवलत पुरेशी नसून ती अजून वाढवायला हवी तरच महिला घर खरेदीदार वाढतील असे तज्ज्ञांचे मत आहे.
श्रद्धा केडिया-अग्रवाल (संचालिका, ट्रान्सकॉन डेव्हलपर्स) - मुद्रांक शुल्कात सवलत देऊनही महिला घर खरेदीदारांच्या टक्केवारीत घसरण झाली आहे. १ टक्के सवलत महिलांना घर खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित होण्यास पुरेशी नाही. आज स्त्रिया स्वतंत्र, सशक्त, शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या आहेत. त्यामुळे महिला घर खरेदीदारांना अतिरिक्त रकमेची ऑफर सरकारने द्यावी.
विवेक राठी (संचालक, नाइट फ्रँक इंडिया) - १ टक्के सवलतीचा निर्णय घेण्यात आला असला तरी महिलांना याचा फायदा होत नसल्याचे दिसत आहे. सरकारने महिला घर खरेदीदारांना मुद्रांक शुल्कात २ टक्के सवलत द्यायला हवी. तेव्हाच घर खरेदीमध्ये महिलांचा वाटा योग्य प्रमाणात दिसून येईल.
चार्ट -
मुद्रांक शुल्कात सवलत दिल्यानंतर घर खरेदीमध्ये महिलांचा वाटा
मुंबईतील घर खरेदी. महिला घर खरेदीदार
एप्रिल - १०,१३६. ६.६ %
मे - ५,३६०. १.८ %
जून - ७,८५७. ४.७ %
जुलै - ९,८२३. ३.० %
ऑगस्ट - ६,७८४. ४.० %