राज्याच्या तुलनेत मुंबईचा काेराेना रुग्ण मृत्युदर कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 06:32 AM2020-11-26T06:32:10+5:302020-11-26T06:32:28+5:30
मुंबईच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, कोरोनाचा राष्ट्रीय मृत्युदर १.४६ टक्के आहे. या तुलनेत मुंबईचा मृत्युदर अधिक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या तुलनेत मुंबईचा कोरोना रुग्ण मृत्युदर कमी झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. जुलै, ऑगस्टदरम्यान ४.९ ते ५ या दरम्यान असणाऱ्या मुंबई शहराच्या काेराेनाच्या मृत्युदरात घट होऊन हे प्रमाण आता १.९७ टक्क्यांवर आले आहे. राज्याचा मृत्युदर सध्या २.६२ टक्के आहे.
मुंबईच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, कोरोनाचा राष्ट्रीय मृत्युदर १.४६ टक्के आहे. या तुलनेत मुंबईचा मृत्युदर अधिक आहे. परंतु, राज्याच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात आयसीएमआर व जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रुग्णसंख्येचे विश्लेषण करण्यात येते. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यास त्याचे तेच कारण ग्राह्य धरले जाते, मात्र आपल्या राज्यात हा कोरोना मृत्यू म्हणून नोंद होताे. त्यामुळे बऱ्याचदा संख्यात्मक तफावत दिसून येते. अजूनही आपल्याकडे उशिराने रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. परिणामी, अशा रुग्णांचा २४-४८ तासांत मृत्यू होतो. शिवाय, अधिकाधिक मृत्यू हे वय अधिक असल्याने आणि अतिजोखमीच्या आजारांमुळे होत असल्याचे दिसून येते आहे.